Prime Minister Modi (PC - ANI)

PM Modi Nepal Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज नेपाळमधील गौतम बुद्धांचे जन्मस्थान लुंबिनी (Lumbini) ला भेट देणार असून नेपाळचे पंतप्रधान शेर बहादुर देउबा (Sher Bahadur Deuba) यांची भेट घेणार आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, दोन्ही नेत्यांमध्ये विकास, जलविद्युत आणि कनेक्टिव्हिटी यासारख्या अनेक क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी चर्चा होऊ शकते. त्याचवेळी एएनआयने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, पीएम मोदींच्या लुंबिनी भेटीदरम्यान पाच सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले की, भारत-नेपाळ संबंध 'अद्वितीय' आहेत. दोन्ही देशांमधील संबंध काळाच्या कसोटीवर उभे राहिले आहेत आणि त्यांच्या नेपाळ भेटीचे उद्दिष्ट हे संबंध अधिक दृढ करणे आहे. बुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर शेजारी देशाच्या दौऱ्याच्या एक दिवस आधी पंतप्रधान मोदींनी हे भाष्य केलं. (हेही वाचा - दिलासादायक! एप्रिलमध्ये 88 लाख लोकांना मिळाला रोजगार; कोरोना महामारीनंतर एका महिन्यात सर्वाधिक नोकऱ्या मिळाल्या)

यासंदर्भात जारी केलेल्या एका निवेदनात पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे की, गेल्या महिन्यात त्यांच्या भारत भेटीदरम्यान त्यांनी नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांची पुन्हा भेट घेण्यास ते उत्सुक आहेत. जलविद्युत, विकास आणि कनेक्टिव्हिटी यासह विविध क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत दोन्ही बाजूंनी झालेला समज पुढे नेण्यात येईल.

पंतप्रधान म्हणाले, 'नेपाळसोबतचे आमचे संबंध अनोखे आहेत. दोन्ही देशांमधील सभ्यता आणि लोक-लोकांमधील संबंध आमच्या घनिष्ठ संबंधांच्या चिरस्थायी इमारतीवर उभे आहेत. शतकानुशतके जोपासले गेलेले आणि आमच्या परस्परसंवादाच्या प्रदीर्घ इतिहासात नोंदवलेले हे काल-परीक्षित संबंध अधिक दृढ करणे हा माझ्या भेटीचा उद्देश आहे.

नेपाळच्या पंतप्रधानांचे प्रेस सल्लागार अनिल परियार यांनी शेअर केलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी देउबा यांच्या निमंत्रणावरून ही भेट देत आहेत. 2014 पासून मोदींचा हा पाचवा नेपाळ दौरा आहे. बुद्ध जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी स्थानिक वेळेनुसार रात्री 10 वाजता लुंबिनी येथे पोहोचतील. लुंबिनी डेव्हलपमेंट ट्रस्टतर्फे आयोजित कार्यक्रमाला ते संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी मायादेवीच्या मंदिरात जाऊन पूजाही करणार आहेत. लुंबिनीमध्येच मोदी आणि देउबा यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहे.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीदरम्यान दोन्ही नेते द्विपक्षीय सहकार्य आणि नेपाळ-भारत यांच्यातील परस्पर हिताच्या मुद्द्यांवर चर्चा करतील. जलविद्युत, विकास आणि कनेक्टिव्हिटी या क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढविण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होईल. यादरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक करारांवर स्वाक्षऱ्याही होणार आहेत. लुंबिनी मोनास्टिक झोनमध्ये बौद्ध संस्कृती आणि वारसा केंद्राच्या बांधकामाच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधान मोदी सहभागी होतील.