राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार? सोनिया गांधी यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
President's Rule (Photo Credits: File Image)

महाराष्ट्राचे (Maharashtra) राजकारण तापले असून राज्यात कोणात्या पक्षाच्या झेंडा फडकणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप- शिवसेना महायुतीने अधिक जागा मिळवल्या असल्यातरी देखील राज्यात अजूनही सत्ता स्थापन झाली नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अनेक दिवस उलटले आहेत. परंतु, मुख्यमंत्रीपदावरुन भाजप-शिवसेना यांच्यात आणखी दरी वाढली आहे. तसेच भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी इतर पक्ष प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, भाजप विरोधी बाकावर बसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे राज्यापालांकडून शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमत सिद्ध करुन दाखवावे असे पत्र पाठवण्यात आले आहे. त्यानुसार, शिवसेना पक्षाकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी अवघे काही तास उरले आहे. महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना पक्ष अधिक धडपड करताना दिसत आहे. राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या तयारीत असून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.