Ramhari Rupanwar, Sonia Gandhi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

निवडणूक काळात जवळपास सर्वच राजकीय पक्ष ग्राऊंड रिपोर्ट ( Ground Report) महत्त्वाचा मानतात. त्यानुसार अनेक नेते ग्राऊंड रिपोर्ट तयारही करतात. परंतू खरा ग्राऊंड रिपोर्ट आपल्या शिर्ष नेतृत्वाला सांगम्याचे धारिष्ट्य काहीच नेते, कार्यकर्ते दाखवतात. खरा ग्राऊंड रिपोर्ट आपल्या नेतृत्वाला सांगणाऱ्या अशाच एका कार्यकर्ता नेत्याची दखल काँग्रेस (Congress) पक्षाच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी घेतली. इतकेच नव्हे तर त्या नेत्याला चक्क आमदारकी दिली. काँग्रेसचे माजी आमदार ॲड. रामहरी रुपनवर (Ramhari Rupanwar) यांनी हा किस्सा सांगितला. (हेही वाचा, Video: शरद पवारांच्या बॉलिंगवर पृथ्वीराज चव्हाण यांची दमछाक; फटकावला नाही एकही चेंडू)

ॲड. रामहरी रुपनवर हा किस्सा सांगताना म्हणाले, लोकसभा निवडणूक 2014 पूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एक कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत आपल्याला किती जागा मिळतील. लोकांचा कल काय? असा प्रश्न विचारण्यात आला. या वेळी अनेक नेत्यांनी वेगवेगळी मते सांगितली. किती जागा मिळतील याचे वेगवेगळे आकडे सांगितले. परंतू, आपण मात्र काँग्रेसला महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक 2014 मध्ये केवळ 2 जागा मिळतील असे सांगितले. यावर अनेक नेते नाराज झाले. त्यांनी मॅडमना असे का सांगितले असेही मला म्हटले. परंतू , मी केवळ मला जे वाटले, माझे जे निरीक्षण आहे तेच सांगितले असे उत्तर दिले.

पुढे बोलताना ॲड. रामहरी रुपनवर म्हणाले. लोकसभा निवडणूक 2014 भाजपने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढवली. काँग्रेसचा मोठा पराभव झाला. काँग्रेसला प्रचंड कमी जागा मिळाल्या. माझा ग्राऊंड रिपोर्ट प्रत्यक्षात आला. दरम्यान, सोनिया गांधी यांनी माझे विधान आणि मी वर्तवलेले भविष्य लक्षात ठेवले होते. त्या वेळी माणिकराव ठाकरे हे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि मोहन प्रकाश प्रभारी. सोनिया गांधी यांनी त्यांना आदेश दिले की, रुपनवर यांना आमदार बनवा. आपल्याला अशी खरी महिती देणारेच कार्यकर्ते हवे आहेत, असे सांगितले आणि मी आमदार झालो असे रुपनवर म्हणाले. दै. सकाळने ॲड. रुपनवर यांच्याबाबत हे वृत्त दिले आहे.