NCP च्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केली खोचक टीका; लेकीला सासरी पाठवल्याबद्दल परळीकरांचे मानले आभार
Pankaja Munde And Rupali Chakankar (Photo Credits: Facebook)

राज्यात अटीतटीची ठरलेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आता अंतिम टप्प्यात आले असून परळी विधानसभा मतदारसंघात भाजपचा धक्कादायक निकाल लागला आहे. भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केलेला दणदणीत पराभव हा भाजपच्या पचनी पडला नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तर परळीतला हा चमत्कारिक निकाल पाहून आनंदून गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ट्विट करत पंकजा मुंडेवर बोचक टीका केली आहे.

या ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत की, "लेकीला सासरी पाठवल्याबद्दल परळीकरांचे मनापासून धन्यवाद" अशी बोचरी टीका करत पंकजा मुंडेवर निशाणा साधला आहे.

हेदेखील वाचा- आमचं ठरलयं! भावी मुख्यमंत्री महायुतीचाच होणार देवेंद्र फडणवीस यांचा दावा

तसेच निवडणूक प्रचारावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांची खणानारळाची ओटी भरुन लेकीची पाठवणी करा असे आवाहन परळीकरांना केले होते. चार दिवस सणासुदीला माहेरपणाला येऊन गोडधोड खा. माहेरच्या लोकांना आशिर्वाद द्या आणि आता सुखाने सासरी नांदा आणि माहेरच्यांना पण सुखाने राहु द्या, अशी खोचक टीका रूपाली चाकणकर यांनी प्रचारादरम्यान पंकजा यांच्यावर केली होती.

दुसरीकडे, विजयानंतर परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष सुरू केला असून जेसीबीतून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळायला सुरूवात केलीये. दुसरीकडे, पंकजा यांच्या घराबाहेर मात्र मोठा शुकशुकाट पाहायला मिळतोय.