Pune Lok Sabha 2024: पुण्यात भाजपकडून आचारसंहितेचा भंग, 'विकसित भारत' पुस्तिकेचं वाटप केल्याचा काँग्रेसचा आरोप; निवडणूक आयोगाकडे तक्रार
BJP | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Pune Lok Sabha 2024: लोकसभा निवडणूक(Pune Lok Sabha Election)च्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यात अचारसंहिता( Code Of Conduct) लागू झाली आहे. पुण्यात भाजपने विकसित भारत या पुस्तिकेचे वाटप केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यामुळे संबंधित भाजप कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे. त्याबाबतची मागणी काँग्रेसने जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे केली आहे. पुण्यातील कोथरूड परिसरात भाजपकडून या पुस्तकांचं वाटप करण्यात आलं होतं. लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचा दाखला देत काँग्रेसने पुणे मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे असलेल्या 'विकसित भारत' पुस्तिकेचं कथित वितरण केल्याप्रकरणी भाजपविरोधात तक्रार दाखल केली आहे.

निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्यावर आचारसंहिता सुरू होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी 16 मार्च रोजी लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. एकूण सात टप्प्यात लोकसभेसाठी मतदान होणार आहे. आचारसंहीतेमध्ये सर्व पक्षांना आणि उमेदवारांना काही नियम आणि अटींचं पालन करावं लागतं. या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाते.

आचारसंहितेमध्ये राजकीय पक्ष, उमेदवार आणि सत्तेत असलेल्या पक्षांचा निवडणूक प्रचार, सभा तसेच मिरवणुकीबाबत नियमावली देण्यात आली आहे.मात्र पुण्यात भाजपकडून आचारसंहितेचा भंग करण्यात आला, असा आरोप काँग्रेसने केला.