एकेकाळचा भाजपचा चाणक्य ठरवणार शिवसेनेची रणनिती?
shivsena | (Photo Credit: File Photo)

Shiv Sena Election Strategy: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नवासस्थान 'मातोश्री' येथे पक्षाच्या खासदारांची एक बैठक आज पार पडली. ही बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली. मात्र, या बैठकीस प्रशांत किशोर (Prashant Kishor) या प्रसिद्ध राजकीय रणनितीकाराची उपस्थिती लागल्याने राजकीयव वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. प्रशांत किशोर यांनी या बैठकीत शिवसेना खासदारांना मार्गदर्शन केल्याचेही वृत्त आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना रणनिती (Shiv Sena Election Strategy) ठरविताना प्रशांत किशोर यांचा सल्ला घेण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, शिवसेनेची आगामी रणनिती ठरविण्यात प्रशांत किशोर यांचा सहभाग असण्याबाबत शिवसेनेच्या गोटातून कोणतीही पुष्टी मिळाली नाही. त्यामुळे ही चर्चा केवळ प्रसारमाध्यमांतूनच पाहायला मिळत आहे.

दरम्यान, खासदारांच्या बैठकीत प्रशांत किशोर यांची उपस्थिती असल्याला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दुजोरा दिल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. प्रशांत किशोर हे प्रसिद्ध राजकीय रणनितीकार आहेतच. पण, सध्या ते जनता दल युनायटेड या पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्षही आहेत. महत्त्वाचे म्हणजे एकेकाळी (2014) ते भारतीय जनता पक्षाचे निवडणूक रणनितीकारही राहिले आहेत. 2014 च्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या मोठ्या विजयात किशोर यांच्या रणनितीचा मोठा वाटा असल्याचे बोलले जाते. (हेही वाचा, राज ठाकरे यांची गांधी घराण्यातील निकटवर्तीयाशी खासगीत बैठक, महाआघाडीत सामील होणार?)

दरम्यान, प्रशांत किशोर यांचा जनता दल युनायटेड हा एनडीएचा घटक आहे. शिवसेनाही एनडीएचा घटक आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ते 'मातोश्री'वर आले होते, असे संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान, भाजपसोबतची युती आणि आगामी निवडणुकीची रणनिती ठरविण्याची जबाबदारी किशोर यांच्यावर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्याबात बोलताना राऊत म्हणाले, दरम्यान, शिवसेना नेहमीच आपली रणनिती ठरवत आली आहे. त्यामुळे आम्हाला युतीसाठी कोणा मध्यस्थाची गरज नाही. युती म्हणजे काही व्यापार नव्हे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सर्व गोष्टींची उत्तरे द्यायला समर्थ आहेत. आगामी काळात आपल्याला सर्व काही कळेल, असेही राऊत म्हणाले. त्यामुळे युतीबाबतच्या चर्चेला पुन्हा एकदा बळ मिळाले आहे.