पंतप्रधान मोदी यांना गुरुबद्दल खंत, म्हणाले 'अपमान झाला तरीही ते काँग्रेससोबतच'
Pm Narendra Modi (File Photo)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी त्यांचे गुरु अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी खंत बोलून दाखवली आहे. 'शरद पवार यांनी जनतेसाठी प्रचंड काम केले. त्यांच्याबद्दल मला व्यक्तिगत आदर प्रचंड आहे. पण, त्यांची चूक इतकीच की, त्यांनी काँग्रेसमध्ये असताना अध्यक्षपदाची निवडणूक लढवली. काँग्रेसने त्यांचा अपमान केला. त्यांना काँग्रेसमधून बाहेर काढले. परंतु, तेच पवार आज पुन्हा ज्या काँग्रेस ( Congress) पक्षाने त्यांना पक्षाबाहेर काढले त्याच काँग्रेससोबत गेले याची आपल्याला मोठी खंत वाटते', असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. बारामती येथील एका सभेत पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार हे आपले राजकारणातील गुरु आहेत. त्यांचे बोट धरुनच आपण राष्ट्रीय राजकारणात आलो, असे जाहीर सभेत सांगितले होते. (हेही वाचा, २०१९मध्ये मोदींची खुर्ची जाणार, माझी भूमिका महत्त्वाची राहणार; शरद पवार यांचे भाकीत)

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच प्रयत्न सुरु केले आहेत. या प्रयत्नांचा भाग म्हणूनच भाजपने मेरा बुथ, सबसे मजबुत हा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमांतर्गत पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी (23 जानेवारी) बारामती, गडचिरोली, हिंगोली, नांदेड, नंदुरबार येथील भाजप कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधला. या संवादादरम्यान, मोदी यांनी शरद पवार यांच्याबाबत खंत बोलून दाखवली.

दरम्यान, व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे केलेल्या या संबंध संवादात पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका करणे मात्र कटाक्षाणे टाळले. उलट पवार यांच्या काँग्रेससोबत जाण्याबद्दल सहानभूती व्यक्त करत 'सॉफ्ट कार्नर'च दाखवला. पंतप्रधान मोदी यांचे शरद पवार यांच्यासोबतचे संबंध नेहमीच सौहार्दपूर्ण राहिले आहेत. तसेच, पंतप्रधान झाल्यानंतर ते दोन वेळा बारामती येथे आले होते. तसेच, पवारांच्या उपस्थिती त्यांनी जाहीर सभेत पावर यांचे कौतुकही केले होते. आताही त्यांनी पवार यांच्याविषयी बोलताना टीका करणे टाळले.