बाळासाहेबांच्या पश्चात उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री'त राज ठाकरे यांचे स्थान कायम
उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे | (Photo courtesy: Archived, edited and representative images)

राजकारणाच्या धुळवडीत टाळी, वडे आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत कितीही भाऊबंदकी केली तरी, ठाकरे कुटुंबीयांतील (Thackeray family) ऋणानुबंध आजही कायम असल्याचे पाहायला मिळते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’(Matoshree )च्या दरवाजाजवळ एक डिजिटल स्क्रिन लावण्यात आली आहे. या स्क्रिनमध्ये शिवसेनेचा प्रवास दाखवण्यात आला आहे. हा प्रवास दाखवताना बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांच्या छायाचित्राचा समावेश आहे. या सर्वात एक छायाचित्र लक्षवेधी ठरते आहे. हे छायाचित्र आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे. राज ठाकरे यांचे स्क्रिनमध्ये वारंवार झळकणारे छायाचित्र पाहून ही पुन्हा एकदा शिवसेना, मनसे यांच्यातील टाळीचे तर संकेत नाहीत ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हायात असतानाच राज ठाकरे यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष काढला. तोपर्यंत शिवसेनेची जवळपास सर्व सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे आली होती. दरम्यान, बाळासाहेबांचे निधन झाले. त्यामुळे सुरुवातील कार्यप्रमुख असलेले उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख झाले. दरम्यान, दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष होत असला तरी, अनेकदा शिवसेना-मनसे युती व्हावी यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न अनेकदा झाले आहेत. अर्थात आतापर्यंत ते कधीच यशस्वी झाले नाहीत. पण, मातोश्रीवर झळकणाऱ्या राज यांच्या छायाचित्रांमुळे दोन्ही पक्ष एकमेकांना टाळी देत पुढे येणार अशी पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. (हेही वाचा, राज ठाकरे इफेक्ट: उत्तर भारतीय नेत्यांना महाराष्ट्रात 'नो एंट्री')

दरम्यान, शिवसेना-मनसे एकत्र येणार का? या प्रश्नावर राज ठाकरे यांनीच एकदा जाहीर वक्तव्य केले होते. एकत्र यायचे तर टाळी एका हाताने वाजत नाही. असे राज यांनी म्हटले होते. दरम्यान, 2014मध्ये विधानसभा निवडणुकीवेळी स्थिती शिवसेना-मनसे युती होण्यापर्यंत आली होती. एकत्र लढण्यासाठी मनसेने उमेदवारांना एबी फॉर्म वाटण्याचेही थांबवले होते. मात्र, अंतिम निर्णय न झाल्याने ही युती झाली नाही. दरम्यान, आता डिजिटल स्क्रिनवरील छायाचित्रामुळे पुन्हा एकदा ही चर्चा सुरु झाली आहे.