Nitin Gadkari on Prime Minister Post: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्याला विरोधी पक्षाकडून थेट पंतप्रधान पदाची ऑफर असल्याचे सांगून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्याकडून आपणास ती ऑफर आली होती, मात्र केवळ विचारधारेसाठी मी तो प्रस्ताव नाकारला, असा गौप्यस्फोट गडकरी यांनी जाहीर सभेत केला आहे. अर्थात त्यांना कोणत्या नेत्याने ही ऑफर दिली याबाबत मात्र कोणतेही भाष्य केले नाही. गडकरी हे आपल्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखले जातात. त्यामुळे ते कोणताही आडपडदा न ठेवता स्पष्ट बोलून जातात.
पंतप्रधान पदाची ऑफर देणारा नेता कोण?
नितीन गडकरी यांनी भाषणादरम्यान म्हटले की, काही दिवसांपूर्वीची घटना आहे. या घटनेतील नेत्याचे नाव मी तुम्हाला सांगणार नाही. पण, त्याने मला थेट ऑफर देत सांगितले की, जर तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. पण, मी त्या नेत्याला स्पष्ट सांगितले की, पंतप्रधान होण्यासाठी तुम्ही मला पाठिबा का द्यावा? आणि तुम्ही दिलेला पाठिंबा तरी मी का घ्यावा? पंतप्रधान पद हे माझ्या आयुष्यातील ध्येय नाही. मी माझ्या केवळ एखाद्या पदासाठी पक्ष आणि तत्वांशी कधीच प्रतारणा करणार नाही. तत्व हेच भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी शक्ती आहे. दरम्यान, ही घटना केवळ किस्सा म्हणून गडकरी यांनी सांगितली असली तरी, भाजप आणि राजकीय वर्तुळात मात्र जोरदार खळबळ उडाली आहे. (हेही वाचा, GNSS Technology मुळे पारंपरीक टोल नाके कालबाह्य, जुन्या प्रणालीस लवकरच Goodbye)
मोदी सरकारला नीतीश कुमार, नायडू यांचा टेकू
लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा नवे सरकार स्थापन झाले. मात्र, 2014 आणि 2019 च्या तुलनेत या वेळच्या सरकारची स्थिती काहीशी वेगळी आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले सरकार अल्पमतात आहे. त्यामुळे पुरेसे बहुमत मिळविण्यासाठी त्यांना नीतीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल आणि चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाची मदत घ्यावी लागली आहे. या दोन पक्षांच्या पाठिंब्यावर असलेल्या या सरकारला काम करताना तारेवरची कसरत करावी लागते आहे. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी केलेल्या विधानाला मोठा अर्थ प्राप्त झाला आहे. दुसऱ्या बाजूला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पक्षांतर्गत विरोधक सध्या अज्ञातवासात गेले असले तरी, त्यांचे अस्तित्व संपले आहे असे नाही. परिणामी या विरोधकांना नितीन गडकरी हे नरेंद्र मोदी यांना पर्याय होऊ शकतो, असे नेहमीच वाटत आले आहे. त्यामुळे गडकरी यांच्या वक्तव्याने भाजपमधील नाराजांना आणि खास करुन नरेंद्र मोदी यांच्या अज्ञात विरोधकांमध्ये उत्साह संचारण्याची शक्यता आहे.