MP CM Kamal Nath | (Photo Credits: PTI/File)

ज्योतिरादित्य सिंधिया ( Jyotiraditya Scindia) यांच्या राजीनाम्यानंतर मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकार ( Kamal Nath Government) चांगलेच अडचणीत आले आहे. बहुमताअभावी हे सरकार कोसळेल की काय, अशी स्थिती आहे. असे असले तरी मुख्यमंत्री कमलनाथ गटाकडून दावा करण्यात येत आहे की, काँग्रेसकडे पुरेसे बहुमत आहे. हे बहुमत सिद्ध करण्याची आपली तयारी असल्याचेही कमलनाथ (Kamal Nath ) गटाकडून सांगण्यात येत आहे. काँग्रेस नेता पीसी शर्मा आणि शोभा ओझा यांनी हा दावा केला आहे.

मध्य प्रदेशच्या राजकारणात मंगळवारी दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या घटना घडल्या. मध्य प्रदेशातील विरोधी पक्षाचे नेते गोपाल भार्गव आणि नरोत्तम मिश्रा विधानसभा अध्यक्ष अनपी प्रजापती यांच्या निवासस्थानी पोहोचले. इथे त्यांनी राजीनामा देत असलेल्या 16 आमदारांची यादी अध्यक्षांकडे सोपवली. त्यानंतर काहीच वेळात मुख्यमंत्री कमलना यांनी काँग्रेस आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीनंतर काँग्रेस नेते पीसी शर्मा आणि शोभा ओझा यांनी दावा केला की, कमलनाथ सरकारकडे पुरेसे बहुमत आहे. हे बहुमत सभागृहात सिद्ध करण्यात येईल.

सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कमलनाथ हे नाराज आमदारांची समजूत काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील. कर्नाटक येथे असलेल्या नाराज आमदारांची समजूत काढण्याची जबाबदारी कमलनाथ यांनी कमलनाथ सज्जन सिंह वर्मा आणि गोविंद सिंह यांच्यासह आणखी तिघांवर सोपवली आहे. ही मंडळी कर्नाटक येथे जाऊन नाराज आमदारांची समजूत काढतील. अशीही चर्चा आहे की, नाराज आमदारांची समजूत काढण्यासाठी जाणाऱ्या मंडळामध्ये एक व्यक्ती राजकारणाबाहेरची आहे. (हेही वाचा, MP Political Crisis: ग्वाल्हेरच्या शिंदे कुटुंबाची राजकीय वाटचाल, राजमाता ते आजचे ज्योतिरादित्य सिंधिया)

काँग्रेस आमदारांचे राजीनामा पत्र हे दबावतंत्राचा वापर करुन घेतले असल्याचा आरोप पीसी शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. दरम्यान, शोभा ओझा यांनी म्हटले आहे की, ज्योतिरादित्य सिंधिया यांना राज्यसभेचे तिकीट द्यायचे आहे. त्यासाठी आमदारांची स्वाक्षरी आवश्यक असल्याचे सांगून सह्या घेतल्याचा दावाही ओझा यांनी केला आहे. हेच स्वक्षरीचे पक्ष पुढे भाजपकडून आमदारांचे राजीनामा पत्र म्हणून सादर केल्याचा ओझा यांचा दावा आहे.

पुढे बोलताना शोभा ओझा यांनी म्हटले आहे की, सीएम कमलनाथ यांनी सर्व आमदारांना विश्वास दिला असून, निश्चिंत राहण्यास सांगितले आहे. सरकारकडे पुरेसे बहुमत असून, विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याच्या वेळी सर्वांनी एकमताने मतदान करावे. कमलनाथ यांनी स्पष्ट केले आहे की, काँग्रेस आमदारांना कुठेही एकत्र करुन स्थानबद्ध केले जाणार नाही. जोपर्यंत कोणताही आमदार विधानसभा अध्यक्षांना प्रत्यक्ष भेटून आपला राजीनामा देत नाही तोपर्यंत त्या आमदाराचा राजीनामा गृहीत धरला जाणार नाही.