मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांना अनधिकृत फेरीवाल्यांच्या विषयावर पत्र लिहिलं आहे. फेरीवाला धोरण आणि त्यातल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरायला लागेल अशी धमकी राज यांनी आपल्या पत्रात दिली आहे. एलफिन्सटन पूल दुर्घटनेनंतर मनसेने अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आंदोलन छेडले होते. त्यानंतर अनेक रेल्वे स्थानकं फेरीवाला मुक्त झाली होती. परंतु आता परिस्थिती जैसे थे झाल्यानंतर मनसेने पुन्हा इशारा दिला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं पत्र
मुंबई महानगरपालिकेने सध्या दहा हजार फेरीवाल्यांच्या जागा फेरीवाला क्षेत्र धोरणाअंतर्गत निश्चित केल्या आहेत. तसेच व्यवसाय करण्यासाठी लागणाऱ्या परवान्यासोबत डोमिसाईल प्रमाणपत्र असणं ही आवश्यक केलंय. परंतु कॉंग्रेसच्या फेरीवाला संघटनेसोबत अन्य फेरीवाला संघटनांनी सुद्धा या कायद्याला विरोध दर्शवला आहे. अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई झाली नाही तर आम्हाला आमच्या पद्धतीने कारवाई करावी लागेल असा इशारा मनसेने या पत्रात दिला आहे.