Maharashtra Politics: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदासाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा खुलासा
Nana Patole | (Photo Credits-Facebook)

महाराष्ट्रात (Mahrashtra) अडीच वर्ष महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार असताना सरकारमध्ये आंतरिक समन्वय नाही किंवा आघाडीत बिघाडी असे आरोप भाजप (BJP) कडून केले जायचे. पण आता सरकार पडल्यानंतर महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर आल्याचं बघायला मिळत आहे. राज्यात शिंदे सरकार स्थापन झालं असुन महाविकास आघाडीवर आता विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली आहे. तेव्हा  शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) किंवा कॉंग्रेस यापैकी एका पक्षाचा विरोधीपक्ष नेता ठरवावा लागणार आहे. परंतू  विरोधी पक्षनेते पदावरुन आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीत रस्सीखेच बघायला मिळत आहे.

 

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेनेने उत्सुक दाखवली असताना आता काँग्रेसनेही (Congress) विरोधी पक्षनेते (Opposition Leader) पदासाठी आपली पसंती दाखवली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला मिळावे असे आम्हाला वाटत असं मत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केलं आहे. तसेच संबंधित बाबींवर शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा सुरू असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत आता विरोधी पक्षनेते पदावरून बिघाडी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. (हे ही वाचा:-Vinayak Mete on Devendra Fadnavis : ‘....तरी आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं!’)

 

विधान परिषदेत शिवसेनेचे 13 आमदार आहेत तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दहा आमदार आहेत. शिवसेनेने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद मिळावे यासाठी नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांना पत्र दिले होते. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काय भुमिका मांडणार यावर सगळ्यांचं लक्ष लागल होतं. तर आता कॉंग्रेसने आपली भुमिका स्पष्ट करत विधान परिषदेच्या विरोधीपक्ष नेते पदाची मागणी केली आहे. काँग्रेसच्या या मागणीला राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्यास महाविकास आघाडीत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होऊ शकतो आणि शिवसेनेला विरोधीपक्ष नेते पदापासूनही मुकावं लागेल. कॉंग्रेसच्या विरोधीपक्ष नेतेपदाच्या मागणीमुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडू शकते. तसेच कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना लवकरच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेणार असल्याची माहिती दिली.