'थँक्यू काँग्रेस, आमची डोकेदुखी तुमच्याकडे घेतल्याबद्दल'; शत्रुघ्न सिन्हा यांच्या भाजप सोडचिठ्ठीवर अरुण जेटली यांची टीका
Arun Jaitley on Shatrughan Sinha | (Photo Credits-Twitter & Facebook)

Lok Sabha Elections 2019: भारतीय जनता पक्ष (BJP) खासदार शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) हे लवकरच पक्षाला सोडचिठ्ठी देणार आहेत. येत्या सहा एप्रिल रोजी ते काँग्रेस प्रवेश करतील. शत्रुघ्न सिन्हा हे गेली प्रदीर्घ काळ केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्यासह पक्षनेतृत्वावर टीका करत आले आहेत. सिन्हा यांच्या संभाव्य काँग्रेस प्रवेशावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली (Arun Jaitley) यांनी जोरदार टीका केली आहे. अभिनेता ते राजकीय नेता असा प्रवास करणाऱ्या सिन्हा यांची अरुण जेटली यांनी भाजपची डोकेदुखी अशी उपहासात्मक संभावना केली आहे. तसेच, आमची डोकेदुखी स्वीकारल्याबद्धल काँग्रेस पक्ष आणि नेतृत्वाचे आभारही मानले आहेत.

अरुण जेटली यांनी फेसबुक ब्लॉगच्या (Arun Jaitley Facebook Blog) माध्यमातून शॉटगन शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर निशाणा साधताना म्हटले आहे की, 'भाजपच्या काही चर्चित चेहऱ्यांना एक भेट म्हणून काँग्रेसने स्वीकारले आहे. त्यासाठी आम्ही काँग्रेसचे आभार मानतो. कारण आमची डोकेदुखी ही आता त्यांची झाली आहे. शुभेच्छा' (हेही वाचा, Lok Sabha Elections 2019: उर्मिला मातोंडकर हिला काँग्रेसकडून तिकीट जाहीर; उत्तर मुंबई मतदारसंघातून लढवणार निवडणूक)

महाआघाडीच्या मुद्द्यावरुनही अरुण जेटली यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेस आणि मित्रपक्षांची महाआघाडी म्हणजे एक सर्कस आहे. महाआघाडी आगोदरच फेल गेली आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील नामांकन अर्ज दाखल करण्याची वेळ येऊ ठेपली आहे. तरही समोर कोणतीही आघाडी दिसत नाही, असे जेटली यांनी म्हटले आहे. काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या आघाडीला ना कोणता नेता आहे. ना, कोणता विचार. आघाडीतील प्रत्येक नेता आपापली उंची पाहण्याचा प्रयत्न करतो आहे. अशी अराजक स्थिती असताना या लोकांना वाटते की, हे लोक सत्ता मिळवू शकतात, असा टोलाही जेटली यांनी मारला आहे.