दिल्ली: राहुल गांधी देणार अध्यक्ष पदाचा राजीनामा? काँग्रेस कार्यकारी समिती बैठकीत प्रस्ताव ठेवण्याची शक्यता
Rahul Gandhi | (Photo Credit : Facebook)

Lok Sabha Election Results 2019: लोकसभा निवडणुकीत देशभरात झालेल्या सर्वाव्यापी पराभव पाहून काँग्रेस पक्ष (Congress Party) हादरुन गेला आहे. काँग्रेसने ही निवडणूक पक्षाध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली लढली होती. या निवडणुकीत काँग्रेसने प्रियंका गांधी यांनाही मर्यादीत स्वरुपात मैदानात उतरवले होते. अनेक प्रयत्न करुनही काँग्रेस ही निवडणूक हारली. भाजपचा देशभरात प्रचंड मोठा विजय झाला. या पार्श्वभूमिवर काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी समिती (Congress Working Committee) आज (25 मे 2019) नवी दिल्ली येथे बैठक घेत आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाचे विश्लेषण या बैठकीत करण्यात येणार आहे. या बैठकीस काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, या बैठकीत राहुल गांधी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरु होताच काँग्रेसमधील काही नेते राहुल गांधी याचा बचाव करण्यासाठीही पुढे आले आहेत. मुंबई काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी राहुल गांधी यांना पाठींबा देत त्यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नये असे म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी काँग्रेसने रणनिती ठरवली होती. ही रणनिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरण्याची होती. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार रणनितीनुसार नरेंद्र मोदी यांना घेरण्यावरच केंद्रीत राहिला. मात्र, त्याचा पक्षाच्या विजयासाठी काहीच उपयोग झाला नाही. थेटच सांगायचे तर, काँग्रेसची रणनिती सपशेल फोल ठरली. या पार्श्वभूमीवर पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

दरम्यान, या बैठकीमध्ये काँग्रेसची सत्ता असलेल्या पाच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतही चर्चा केली जाणार असल्याचे समजते. तसेच, विविध राज्यांमध्ये पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये असलेल्या वादविवादांवरही चर्चा होणार असल्याचे समजते. यात प्रामुख्याने पंजाब राज्याचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि मंत्री नवज्योत सिंह सिद्धू, महाराष्ट्र काँग्रेसमधील सुंदोपसुंदी अशा एक ना अनेक गोष्टींवर चर्चा कोली जाऊ शकते. (हेही वाचा, महाराष्ट्रात शिवसेनेचा आवाज वाढला, जाणून घ्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षांना किती टक्के मतं मिळाली?)

दरम्यान, या बैठकीत काय चर्चा होते या पेक्षा सर्वाधिक उत्सुकता आहे की, राहुल गांधी हे खरोखरच आपल्या पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार का? तसेच, राहुल गांधी यांनी पक्षाचा राजीनामा दिलाच तर तो राजीनामा पक्ष आणि काँग्रेसचे धुरीण स्वीकारणार का? प्रश्न बरेज आहेत. जे अद्याप गुलदस्त्यात आहेत. काँग्रेस बैठकीत त्यावर चर्चा होईल असे संकेत आहेत.