पेगासस (Pegasus), कृषी कायदे यावरुन विरोधक सध्या जोरदार आक्रमक आहेत. कधी नव्हे तो सत्ताधारी वर्गालाही या विरोधाची दखल घ्यावी लागत आहे. अशात काँग्रेस नेते कपील सिब्बल (Kapil Sibal) यांच्या घरी विरोधकांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. निमित्त होते कपील सिब्बल यांचा वाढदिवस. या स्नेहभोजनास विरोधी पक्षातील जवळपास सर्व प्रमुख नेते झाडून उपस्थित होते. या वेळी सहाजिकच काँग्रेस पक्ष आणि नेतृत्व तसेच विरोधकांचे नेतृत्व याबाबत विविध मुद्दे चर्चेला आले. या चर्चेत अनेकांनी विरोधकांचे नेतृत्व काँग्रेसने करावे याबाबत सहमती दर्शवली. परंतू, या सहमतीसोबतच जोपर्यंत गांधी कुटुंब काँग्रेसचे नेतृत्व करत आहे तोपर्यंत काँग्रेस पुन्हा उभी राहणे कठीण असल्याचेही म्हटले, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
काँग्रेस नेते कपील सिब्बल यांच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनास, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत, टीएमसीचे खासदार डेरेक ओब्रायन, आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव, द्रमुकचे तिरुची शिवा, आरएलडीचे नेते जयंत चौधरी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, काँग्रेसचे खासदार शशी थरूर आणि आनंद शर्मा तसेच, बीजेडीचे पिनाकी मिश्रा, अकाली दलचे नरेश गुजराल, आम आदमी पार्टीचे संजय सिंह यांच्यासह इतरही विरोधी पक्षाचे नेते कपिल सिब्बल यांच्या निवासस्थानी उपस्थित होते. कबील सिब्बल यांच्या घरी जवळपास 15 पक्षांचे 45 नेते उपस्थित होते. (हेही वाचा, Pegasus Snooping Controversy: राहुल गांधी यांची विरोधकांसोबत ब्रेकफास्ट मीटिंग; सत्ताधाऱ्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत रणनितीसाठी बैठक)
कपील सिब्बल यांच्या घरी उपस्थित असलेल्या राजकीय पक्षांबाबत एक महत्त्वाचे असे की,यातील काही पक्ष असे अहेत ज्यांना विरोधी पक्षांच्या बैठकीला बोलावले जात नाही. जर बोलावलेच तर यातील अनेक पक्ष उपस्थितच राहात नाहीत. परंतू, सिब्बल यांच्या घरी मात्र हे नेते एटजुटीने उपस्थित होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही विरोधी पक्षांना ब्रेकफास्ट डिनरसाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलावले होते. या बैठकीलाही अनेक नेते उपस्थित होते. या वेळी बैठकीचे निमंत्रण असूनही आपचा प्रतिनीधी या बैठकीस उपस्थित नव्हता.
एएनआय
Delhi: NCP chief Sharad Pawar, TMC MP Derek O'Brien, RJD chief Lalu Prasad, DMK's Tiruchi Siva, RLD leader Jayant Chaudhary, Samajwadi Party chief Akhilesh Yadav, Congress MPs Shashi Tharoor & Anand Sharma & other Opposition leaders arrive at Kapil Sibal's residence for a meeting pic.twitter.com/RgHsMXDBmj
— ANI (@ANI) August 9, 2021
राहुल गांधी हे सोमवारी दोन दिवसांच्या कश्मीर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ही डिनरपार्टी आयोजित करण्यात आली होती. ही पार्टी आयोजित करणारे कपील सिब्बल हे काँग्रेसमधील त्या G23 चे सदस्य आहेत. ज्यामध्ये काँग्रेसच्या असंतृष्ठ नेत्यांनी काँग्रेस नेतृत्वास नेतृत्वबदलाबाबत पत्र लिहिले होते. विशेष म्हणजे कपील सिब्बल यांच्या घरी आयोजित बैठकीस गुलाम नबी आजाद, भूपिन्दर सिंह हुड्डा, आनंद शर्मा, मनीष तिवारी, शशि थरूर आणि संदीप दीक्षित हेसुद्धा उपस्थित असल्याचे समजते.