Jayant Patil on CM Post: राष्ट्रवादी काँग्रेसने सोडली मुख्यमंत्री पदाची संधी जयंत पाटील यांनी सांगितले कारण
Jayant Patil | (Photo Credits: Facebook)

अनेक वर्षे सत्तेत असूनही राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचा मुख्यमंत्री राज्यात का झाला नाही, असा सवाल नेहमी उपस्थित केला जातो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. आमच्या आमदारांची संख्या जास्त होती. आम्हाला मुख्यमंत्री पदाची संधीही आली होती. मात्र, सर्वांनाच सोबत घेऊन जायचे म्हणून आम्ही ती संधी सोडून दिली, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. आता पुढीलकाळात 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून येईल यासाठी प्रयत्न केले जातील. महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष अशी भेट शरद पवार (Sharad Pawar) यांना द्यायची आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ते तळेगाव येथील सभेत बोलत होते.

एक वेळ आम्ही 72 आमदार संख्येवर पोहोचलो होतो. तेव्हा महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री करण्याची आम्हाला संधी होती. मात्र, आघाडीमध्ये सर्वांना सोबत घेऊन जाऊयात या कारणास्तव आम्ही ही संधी सोडून दिली. आता 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकाँग्रेस पक्षाचे आमदार सर्वाधिक आणायचे आहेत. त्यासाठी जिद्द बाळगली पाहिजे. पक्ष उभारण्यासाठी शरद पवार यांनी आयुष्य वेचलं आहे. आजही ते 24 तास काम करतात. आपण सर्वच जण हे पाहतो आहोत. त्यामुळे शरद पवार यांना 2024 मध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निवडून आणून तशी भेट द्यायची असल्याचे पाटील म्हणाले. (हेही वाचा, Nawab Malik In ED Office: नवाब मलिक यांना ईडी कार्यालायत बोलावल्यानंतर शरद पवार, संजय राऊत, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह अनेकांनी दिली प्रतिक्रिया)

दरम्यान, जयंत पाटील यांनी ईडीने नवाब मलिक यांना अटक केल्याबद्दलही मत व्यक्त केले. नवाब मलिक यांनी ईडीने 15 मनिटे जरी दिली असती तरी त्यांनी ईडीला सर्व कागदपत्रे दिली असती. पण या प्रकरणात NIA चा प्रवेश व्हावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. नवाब मलिक यांनी केंद्रीय यंत्रणांच्या विरोधात जी भूमिका घेतली त्यातून केंद्र आणि राज्यातीलही अनेकांचे मुखवटे उघडे पडले असते. म्हणूनच मलिक यांच्यावर कारवाई करण्या आल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.