जम्मू कश्मीर (Jammu and Kashmir) मध्ये आज पहिल्या टप्प्यातील विधानसभेसाठी मतदान (Assembly Elections) सुरू झाले आहे. कलम 370 रद्द केल्यानंतर ही जम्मू कश्मीर मधील पहिलीच निवडणूक आहे. पहिल्या टप्प्यांत आज 24 जागांसाठी मतदान पार पडत आहे. यामध्ये जम्मूत 8 आणि कश्मीर मध्ये 16 जागांवर मतदान होणार आहेत. सुमारे 23.27 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क आज बजावू शकणार आहेत. मतदानाच्या पार्श्वभूमीवर आज कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केले आहे.
जम्मू कश्मीर मध्ये आज मतदान
#WATCH | Jammu and Kashmir: Voting underway for the 1st phase of Assembly elections; visuals from a polling station in Jagti under Kulgam Assembly Constituency. pic.twitter.com/nvCZhAlys5
— ANI (@ANI) September 18, 2024
जम्मू कश्मीर विधानसभेच्या मतदानाचा पुढील टप्पा 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर दिवशी आहे तर निवडणूकीचा निकाल 8 ऑक्टोबर दिवशी जाहीर केला जाणार आहे.
2014 मध्ये झालेल्या शेवटच्या मतदानामध्ये मेहबुबा मुक्तींच्या पीडीपी ने आज मतदान होत असलेल्या 24 जागांपैकी 11 जागा जिंकल्या होत्या तर भाजप आणि कॉंग्रेसने प्रत्येकी 4 जागा जिंकल्या होत्या. फारूक अब्दुला यांच्या नॅशनल कॉंग्रेस आणि CPI(M) च्या वाट्याला 1 जागा आली होती.
दरम्यान 2014 विधानसभा निवडणूक निकालानंतर पीडीपी- भाजपा ने सरकार बनवलं होतं मात्र हे सरकार 6 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नव्हते. भाजपा ने पाठिंबा काढून घेतल्याने 2018 मध्ये मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींच्या पीडीपी चं सरकार कोसळलं होतं.
आता जम्मू कश्मीर हा केंद्रशासित प्रदेश झाला आहे. विधानसभेचा कार्यकाळ आता 6 ऐवजी 5 वर्ष असणार आहे.