Coronavirus: भाजपला खडसावणारे एकनाथ खडसे 'मेरा आंगन मेरा रणांगन' आंदोलनात फलक घेऊन सहभागी
Eknath Khadse | (Photo Credit: Twitter)

निवडणूक विधानसभेची असो अथवा विधान परिषदेची भारतीय जनता पक्षाला जाहीरपणे खडसावणारे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आज भाजप (BJP) आंदोलनात फलक घेऊन सहभागी झाली. कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट निवारणात मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अपयशी ठरल्याचा भाजपचे म्हणने आहे. त्याबाबत ही भावना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि सरकारचे लक्ष्य वेधून घेण्यासाठी भाजपने 'मेरा आंगन मेरा रणांगन' ( Mera Aangan Mera Ranangan) या आंदोलनाचे आयोजन आज केले आहेत. या आंदोलनात भाजपचे विविध नेते सहभागी झाले. मात्र, भाजप ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हेसुद्धा या आंदोलनात सहभागी झाल्याने राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे एकनाथ खडसे यांनी आंदोलनात सहभागी होताना "उद्धवा... अजब तुझे निष्फळ सरकार" असा फलकही हाती धरला होता.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून गेली अनेक वर्षे भाजप तिकीटावर एकनाथ खडसे निवडूण येत होते. मात्र, विधानसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपने त्यांचे तिकीट कापले. त्या जागेवर त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली. त्यात रोहिणी यांचा पराभव झाला. पुढे विधानपरीषद निवडणूक 2020 मध्ये खडसे यांचे भाजप पुनर्वसन करेन अशी आशा होती. मात्र, इथेही त्यांची निराशा झाली. त्यामुळे खडसे यांनी उघडपणे आपली नाराजी अनेकदा बोलून दाखवली आहे. गेल्या काही काळात खडसे भाजपला सोडचिठ्ठी देऊ शकतात अशीही चर्चा सुरु होती. त्यामुळे या आंदोलनात खडसे सहभागी होणार का? याबाबत उत्सुकता होती. ही उत्सुकता फारशी शिगेला पोहचू न देता खडसे यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला.

एकनाथ खडसे हे आपल्या मुक्ताई नगर (जि. जळगाव) येथील निवासस्थानातून आंदलनात सहभागी झाले. या वेळी खासदार रक्षा खडसे याही उपस्थित होत्या. (हेही वाचा, महाराष्ट्र भाजप नेत्यांचे केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या सरकारविरोधात आंदोलन, शिवसेना खासदार संजय राऊत यांची 'मेरा आंगन मेरा रणांगन' वर टीका)

रक्षा खडसे ट्विट

महाराष्ट्रातील भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी आदोलन केले. या वेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार 'उद्धवा अजब तुझे निष्फळ सरकार' ही घोषणा मुख्यत्वे द्या, असे आदेश चंद्रकात दादा पाटील यांनी दिले आहेत. या प्रमुख घोषणेसोबतच 'महाराष्ट्राची जनता मरणाच्या दारात, उद्धव सरकार मात्र आपल्या घरात', ठाकरे सरकार हाय हाय', 'उद्धव मात्र भाषण ठोकतो डरोना डरोना पण रोखता येईना तुला करोना करोना', 'हातात वाडगे-केंद्राकडे बोट, निर्णयात मात्र तुझ्याच खोट' अशा घोषणांचे फलक या कार्यकर्ता, नेत्यांच्या हातात होते. या घोषणा आणि आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आले आहे.