sonia Gandhi | Twitter

दिल्लीमध्ये संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. या कामकाजाची सुरूवात लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयकावर (Women's Reservation Bill) चर्चेने झाली आहे. कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी लोकसभेत बोलताना महिला आरक्षणाला काँग्रेसचा पाठिंबा देत असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी हे विधेयक राजीव गांधी यांचं स्वप्न असल्याचं म्हटलं आहे. हे विधेयक यापूर्वीही संसदेत आलं होतं पण मंजूर होऊ शकलेलं नाही. त्यामुळे आता हे लवकरात लवकर लागू करण्याची वेळ आली असल्याचं म्हटलं आहे.

देशभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून 15 लाख महिला नेत्या निवडून आल्या आहेत. राजीव गांधींचे स्वप्न आतापर्यंत अर्धेच पूर्ण झाले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास त्यांचं स्वप्न पूर्ण होईल अशी आशा त्यांनी बोलून दाखवली आहे. या विधेयकाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी काँग्रेसची मागणी आहे. सरकारने Delimitation होईपर्यंत थांबवू नये. याआधी जात जनगणना करून या विधेयकात एससी-एसटी आणि ओबीसी महिलांनाही आरक्षण द्यावे. असंही  सोनिया गांधी यांनी सुचवलं आहे.

पहा सोनिया गांधी यांचं भाषण

महिला आरक्षणाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची घोषणा काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेमध्ये केली. त्यानंतर विरोधकांनी लोकसभेमध्ये विधेयक मांडताच गदारोळ करत हा 'अजून एक निवडणूक जुमला' असल्याचं म्हटलं आहे. निर्मला सीतारामन, स्मृती इराणी, दिया कुमारी भाजपच्या बाजूने आपले म्हणणे मांडणार आहेत. ही चर्चा सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

महिला आरक्षण विधेयक (नारी शक्ती वंदन विधेयक) 19 सप्टेंबर रोजी नवीन संसदेच्या कामकाजाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत सादर करण्यात आले. या विधेयकानुसार लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू केले जाईल. लोकसभेच्या 543 जागांपैकी 181 जागा महिलांसाठी राखीव असतील. हे आरक्षण 15 वर्षे टिकेल. यानंतर संसदेची इच्छा असल्यास ती मुदत वाढवू शकते.