Anna Hazare | (Photo Credits: You Tube)

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी भारतीय जनता पक्ष (BJP) आणि दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता (Aadesh Gupta) यांना स्पष्ट शब्दांमध्ये खडेबोल सुनावले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)यांच्या आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात भाजपने आंदोलन उभारले आहे. या आंदोलनात अण्णा हजारे यांनी सहभागी व्हावे, असे अवाहन दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्षांनी अण्णा हजारे यांना पत्र पाठवून गेल्याच आठवड्यात केले होते. या पत्राला अण्णा हजारे या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ (Anna Hazare Video) शेअर करत अण्णांनी भाजप आणि केंद्र सरकारला थेट प्रश्न विचारले आहेत. अण्णा हजारे यांनी दिल्ली भाजपला लेखी पत्रद्वारे उत्तरही दिल्याचे समजते.

अण्णा हजारे यांनी म्हटले आहे की, दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी माझी कोणतीही पूर्व परवानगी न घेता प्रेसनोटमध्ये माझे नाव घेतले. या पत्रात म्हटले आहे की, दिल्लीत असलेल्या आम आदमी पार्टी सरकारने भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर केला आहे. दिल्लीच्या जनतेला तुम्ही हे सांगा असा उल्लेख या पत्रात आहे. या पत्राला मी लेखी स्वरुपात उत्तर दिले आहे. यात मी म्हटले आहे की 2014 पासून देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सांगत आहेत की भ्रष्टाचार रोखण्यासाठी आमच्या पक्षाने कठोर पावले उचलली आहेत. दुसऱ्या बाजूला भाजपचेच प्रदेश अध्यक्ष म्हणत आहेत भ्रष्टाचार वाढला आहे. नेमके काय समजायचे?

दिल्ली हे केंद्र शासित राज्य आहे. या राज्यातील अनेक गोष्टी केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात. जर आपल्याला असे वाटत असेल की दिल्ली सरकारने भ्रष्टाचार केला तर आपण त्या विरोधात कारवाई का करत नाही. केंद्र सरकार पावले का उचलत नाही. असे न करता आपण प्रेसनोट काढता आणि त्यात माझ्या नावाचा उल्लेख का करता, असा सवालही अण्णा हजारे यांनी भारतीय जनता पक्षाला विचारला आहे. (हेही वाचा, अण्णा हजारेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; आपली सुरक्षा काढून घेण्याची मागणी, 'जनतेच्या पैशांचा अपव्यय नको')

अण्णा हजारे व्हिडिओ

पुढे बोलताना अण्णा हजारे यांनी म्हटले आहे की, गेली 22 वर्षे मी अनेक आंदोलने केली. ही सर्व आंदोलने भ्रष्टाचाराविरोधात आहेत. माझ्या आंदोलनामुळे ज्या पक्षाचे नुकसान होते ते माझे नाव त्यांच्या विरोधातील पक्षाशी जोडतात आणि गैरसमज पसरवतात. आजपर्यंत मी कोणत्याच पक्षासोबत गेलो नाही. जाणार नाही. देशातील जनतेला अद्यापही स्वतंत्र्य, लोकशाही निटशी कळली नाही. जनतेला खऱ्या स्वातंत्र्याचा लाभ अद्याप मिळालेला नाही. त्याचा गैरफायदा घेऊन राजकीय पक्ष सत्ता मिळवतात. सत्तेतून पैसा पैशातून सत्ता असे त्यांचे दृष्टचक्र सुरु आहे. त्याविरोधात जनतेने दबाव गट निर्माण करुन लढले पाहिजे, असेही अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.