Photo Credit -X

PoJK Erupts: पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर (POK) मध्ये सध्या तणावाचे वातावरण आधिक गडद होताना दिसत आहे. शनिवारी तेथे लष्कर आणि आंदोलकांमध्ये चकमक झाली. ज्यात एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मिरपूरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक (SSP) कामरान अली उपनिरीक्षक अदनान कुरेशी यांचा इस्लामगढ शहरात छातीत गोळी लागल्याने मृत्यू झाला. त्याशिवाय, इतर 90 जण जखमी झाले आहेत. मुझफ्फराबाद मार्गे येणारी आंदोलकांची रॅली थांबवण्यासाठी ते इतर पोलिस कर्मचाऱ्यांसह तैनात होते. यादरम्यान, ही घटना घडली. जॉइंट अवामी ॲक्शन कमिटी (JAAC) च्या बॅनरखाली कोटली आणि पूंछ येथे आंदोलकांनी रॅली काढली. त्यावेळी ही चकमकीची घटना घडली.

बुधवारी आणि गुरुवारी रात्री सुमारे 70 जॉइंट अवामी ॲक्शन कमिटीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानांवर आणि मुझफ्फराबाद, मीरपूर येथून त्यांच्या नातेवाईकांच्या घरी छापेमारी करून अटक केली होती. परिणामी गुरुवारी दड्यालमध्ये परिस्थीती चिघळण्याचे चित्र होते. त्यानंतर समितीने आज मुझफ्फराबादकडे नियोजित लाँग मार्चचे नियोजन केलेल होते. शुक्रवारपासून तेथे चक्काजाम आंदोलन सरू होते.

दरम्यान, आंदोलन थोपवण्यासाठी अधिका-यांनी मुझफ्फराबादकडे जाणाऱ्या मार्गांवर मातीचे ढिगारे ठेवले होते. मुझफ्फराबाद आणि पूंछ येथे संप पाळण्यात आला होता. एसएसपी यासीन बेग यांनी सांगितल्या प्रमाणे, आदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला होता त्याशिवाय, हवेत गोळीबार झाला होता. ज्यात एक पोलीस अधिकारी आणि एक लहान मुलगा जखमी झाला होता.

कोटली एसएसपी मीर मुहम्मद आबिद यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, " आंदोलकांकडून निषेधांच्या नावाखाली सुरू असलेल्या हल्ल्यात 78 पोलिस जखमी झाले आहेत." ज्यात 59 पोलीस आणि महसूल विभागाचे दोन अधिकारी जखमी झाले. त्याशिवाय, सेहंसा बरोइयान येथे १९ पोलीस जखमी झाले, असे एसएसपी मीर मुहम्मद आबिद यांनी सांगितले.

कोटली येथील जिल्हा मुख्यालय रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार 59 जखमी पोलिसांव्यतिरिक्त नऊ आंदोलक देखील जखमी झाले आहेत.

एसएसपी आबिद यांनी सांगितले की, डोलिया जट्टनमध्ये काही पोलीस अधिकारीही जखमी झाले आहेत.

पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) चे प्रादेशिक सरचिटणीस चौधरी तारिक फारूक म्हणाले, "पाकिस्तानमधील शक्तिशाली आणि जबाबदार मंडळांना लोकांबद्दल काही चिंता असल्यास त्यांनी खूप उशीर होण्यापूर्वी त्वरित लक्ष दिले पाहिजे." पीएमएल-एन नेते राजा फारूक हैदर यांनी आंदोलकांना शांततेत निदर्शने करण्याचे आणि कायदा सुव्यस्था न बिघडवता सरकारी मालमत्तेचे नुकसान न करण्याचे आवाहन आंदोलकांना केले आहे.