PM Narendra Modi (Photo Credits: ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) 2 मे रोजी युरोप दौऱ्यावर (PM Modi on Europe Visit) रवाना होणार आहेत. 2022 मधील त्यांचा हा पहिलाच विदेश दौरा असेल. या 3 दिवसांच्या युरोप दौऱ्यात ते जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्स या 3 देशांना भेट देणार असून 25 कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. सरकारी सूत्रांनी ही माहिती दिली. सरकारी सूत्रांनी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेला सांगितले की, पंतप्रधान मोदी 7 देशांच्या 8 नेत्यांसोबत द्विपक्षीय आणि बहुपक्षीय बैठका घेणार आहेत. याशिवाय 50 जागतिक उद्योजकांशी ते संवाद साधणार आहेत. यासोबतच या देशांमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांनाही भेटणार आहोत. पीएम मोदींचा युरोप दौरा जर्मनीपासून सुरू होईल आणि त्यानंतर ते डेन्मार्कला जातील आणि फ्रान्सहून 4 मे रोजी भारतात परततील.

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युरोप दौरा होत आहे. सर्व युरोपीय देश रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या विरोधात आहेत. असे मानले जात आहे की दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेला लष्करी वाद संपवण्यासाठी पंतप्रधान मोदी चर्चा करू शकतात.

जर्मनी आणि डेन्मार्कमध्ये होणार महत्त्वाच्या बैठका 

जर्मनीतील त्यांच्या मुक्कामादरम्यान, पंतप्रधान मोदी बर्लिनमध्ये चांसलर ओलाफ स्कोल्झ यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. हे दोन्ही नेते भारत-जर्मनी आंतरसरकारी सल्लामसलतांच्या सहाव्या आवृत्तीचे सह-अध्यक्ष असतील. यादरम्यान पीएम मोदी आणि चांसलर स्कोल्झ संयुक्तपणे व्यवसाय कार्यक्रमाला संबोधित करतील. (हे देखील वाचा: Maharashtra Din 2022: देशाच्या प्रगतीत या राज्याने अभूतपूर्व योगदान - पंतप्रधान मोदींच्या मराठीतून खास शुभेच्छा)

जर्मनीनंतर पंतप्रधान मोदी डेन्मार्कला पोहोचतील आणि तेथे भारत-नॉर्डिक शिखर परिषदेला उपस्थित राहतील. यानंतर पंतप्रधान मोदी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये 4 मे रोजी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेणार आहेत. भारत आणि फ्रान्स यांच्या राजनैतिक संबंधांना यावर्षी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. पीएम मोदी आणि मॅक्रॉन यांच्या बैठकीत धोरणात्मक भागीदारीवर चर्चा होणार आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या 2 वर्षात अनेक प्रसंगी अनेक जागतिक नेत्यांनी आपले परदेश दौरे पुढे ढकलले होते आणि आभासी माध्यमातून विविध शिखर परिषदांना हजेरी लावली होती.