Photo Credit- X

Amarnath Yatra Bus Accident: जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यातून एक व्हिडिओ समोर आला आहे. राष्ट्रीय महामार्ग-44 वर अमरनाथ यात्रेवरून परतणाऱ्या बसचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे बसमधील प्रवाशांनी भीतीने खाली उड्या मारायला (Passengers Jump off Moving Bus)सुरुवात केली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या लष्कराच्या जवानांना बस दिसली असता त्यांनी तात्काळ तिचा पाठलाग केला आणि बसखाली दगड फेकून ती खड्ड्यात पडण्यापासून वाचवली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेवेळी बसमध्ये एकूण 40 यात्रेकरू प्रवास करत होते. जे पंजाबमधील होशियारपूरला परतत होते. या घटनेत एकूण 10 जण जखमी झाले आहेत. यामध्ये 6 पुरुष, 3 महिला आणि 1 लहान मुलाचा समावेश आहे. मात्र, या घटनेत मृत्यूची नोंद झालेली नाही.

ब्रेक फेल झाल्यानंतर यात्रेकरूंनी धावत्या बसमधून उडी मारली

बस अमरनाथ यात्रेकरूंना घेऊन बस परतत होती. दरम्यान, बस बनिहालजवळ नचलाना येथे पोहोचली तेव्हा ब्रेक फेल झाला. यानंतर काही यात्रेकरू घाबरले आणि त्यांनी बसमधून उड्या मारायला सुरुवात केली. धावत्या बसमधून यात्रेकरूंना उड्या मारताना लष्कराचे जवान आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी पाहिले. यानंतर त्यांनी बसचा पाठलाग करून टायरखाली दगड टाकून बस खड्ड्यात पडण्यापासून वाचवली. यानंतर मदत पथक घटनास्थळी पोहोचले आणि लोकांना वैद्यकीय मदत दिली.