पतंजलिचे दुधही येणार बाजारात; इतर दुधांपेक्षा दोन रुपयांनी स्वस्त
योगगुरू रामदेवबाबा

अतिशय कमी कालावधीमध्ये स्वदेशी उत्पादने तयार करणाऱ्या पतंजलिने फार मोठा पल्ला गाठला आहे. भारतात असे क्वचित एखादे शहर असेल जिथे पंजालिची उत्पादने मिळत नसतील. रोजच्या जीवनातील जवळजवळ प्रत्येक गोष्टीमध्ये पतंजलिने शिरकाव केला आहे. आयुर्वेदिक उत्पादनांसह आता योगगुरु रामदेव बाबांनी पतंजलिच्या उत्पादनामध्ये आणखी वाढ केली आहे. रामदेव बाबांनी आज (१३ सप्टेंबर) गायीचं दूध आणि त्यापासून बनलेली उत्पादने तसेच फ्रोजन भाज्या, बाटलीबंद पाणी, सोलर पॅनल, पशु चारा अशी उत्पादने लॉन्च केली. तसेच दिवाळीत पतंजलिचे कपडेही बाजारात घेऊन येत असल्याची घोषणा रामदेव बाबांनी केली.

माफक दर हे पतंजलिच्या उत्पादनाचे वैशिष्ठ्य या दुग्धजन्य उत्पादनाच्या बाबतीतही दिसून येणार आहे. हीच गोष्ट सर्वसामान्यांसाठी आनंददायी ठरणार आहे कारण, पतंजलिचे हे दुध २ रुपयांनी स्वस्त असणार आहे.

दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये डेअरी प्रॉडक्ट्स लॉन्च करण्याआधी स्वत: रामदेव बाबांनी गायीचं दूध काढलं. पतंजलिने दिल्ली-एनसीआर, मुंबई, पुणे आणि राजस्थानमध्ये दुधाच्या पुरवठ्यासाठी ५६,००० किरकोळ विक्रेते आणि व्यापाऱ्यांसोबत करार केला आहे. यामधून २०१९-२० मध्ये दरदिवशी १० लाख लिटर गायीच्या दुधाचा पुरवठा होईल, अशी आशा कंपनीला आहे. पहिल्या टप्प्यात दिल्ली-एन+]सीआर, राजस्थान, हरियाणा आणि महाराष्ट्रात याच्या विक्रीची सुरुवात होणार आहे. इतर राज्यात हळूहळू विक्रीला सुरुवात होईल. कंपनीने या आर्थिक वर्षात दुग्धजन्य उत्पाजनांच्या माध्यमातून ५०० कोटी रुपयांच्या महसुलाचं लक्ष्य ठेवलं आहे.

याच वर्षी आपल्या व्यवसायाची व्रुद्धी करण्यासाठी पतंजलिने अनेक मोठ मोठ्या इ- कॉमर्स कंपन्यांसोबत करार केला होता. यामध्ये अमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट, बिग बास्केट, ग्रोफर्स, 1एमजी, नेटमेड्स, शॉपक्लूज आणि पेटीएम मॉल अशा कंपन्यांचा समावेश होतो. पतंजलिची वार्षिक उलाढाल ही साधारण ५०, ००० करोड रुपयांची आहे. कंपनीची जास्तीत जास्त उत्पादने हरिद्वार आणि तेजपूरमध्ये तयार केली जातात. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार पतंजलिची उत्पादने संयुक्त अरब अमिरात, अमेरिका, कॅनडा, युरोप, दक्षिण अमेरिका, आफ्रिकन देशांतही निर्यात केली जातात. पतंजलिची होणारी वाढ आणि लोकप्रियता पाहून अनेक कंपन्यांनी धसका घेतला होता, आता ही निवीन उत्पादांमुळे पतंजलि पुन्हा एकदा या कंपन्यांना टक्कर देण्यास तयार झाली आहे.