Maharashtra: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आज सुनावणी होणार आहे. परमबीर सिंह यांनी आपल्या याचिकेत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला असून त्यांची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. याचिकेत त्यांनी त्यांच्या बदली आदेशाला आव्हानही दिले आहे.
परमबीर सिंग यांनी हॉमगार्ड विभागात बदली झाल्यानंतर 22 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेतील सर्व आरोपांची चौकशी सीबीआयमार्फत व्हावी. तसेच अनिल देशमुख यांच्या घराबाहेर सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. (वाचा - Mumbai Police Transfer: सचिन वाझे प्रकरणाचे पडसाद, मुंबई पोलीस दलात बदलीची लाट; 65 पोलीस अधिकाऱ्यांची उचलबांगडी)
परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर गंभीर आरोपांनी घेरल्या गेलेल्या अनिल देशमुख यांनी मंगळवारी उशिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. विरोधी पक्षाकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची सतत मागणी होत आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या रिपोर्टबाबत चर्चा केली.
दरम्यान, मंगळवारी मुंबई पोलीस दलातील तब्बल 86 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात मुंबई गुन्हे शाखेतील 65 अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला घेरलं आहे.