मुंबईतील (Mumbai) एका तरुणीशी सोशल मीडियावरील मैत्री पाकिस्तानी (Pakistan) तरुणाला महागात पडली. या तरुणाने मुलीला भेटण्यासाठी भारत-पाकिस्तान सीमा (India-Pakistan Border) ओलांडण्याचा प्रयत्न केला, परंतु तारेचे कुंपण ओलांडताना भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला पकडले. सध्या सुरक्षा यंत्रणा तरुणांची चौकशी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील गंगानगरच्या अनुपगढ भागातील भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवरील सीमा सुरक्षा दलाच्या कैलाश आणि शेरपुरा चौकी दरम्यान एक पाकिस्तानी तरुण सीमा रेषेजवळ पोहोचला. त्याने तारेचे कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न करताच सीमेवर असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी या तरुणाला आव्हान देत त्याला पकडले. सीमा सुरक्षा दलाच्या चौकशीत तरुणाने आपले नाव मोहम्मद अमीर, वय 22 वर्षे असल्याचे सांगितले.
हा तरुण पाकिस्तानातील बहावलपूरचा रहिवासी आहे. झडती दरम्यान त्याच्याकडून पाकिस्तानी चलन आणि मोबाईल जप्त करण्यात आला. प्राथमिक चौकशीत तरुणाने सोशल मीडियावर मुंबईतील एका तरुणीशी मैत्री असल्याचे सांगितले. हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. सध्या सीमा सुरक्षा दलासह सुरक्षा यंत्रणा पाकिस्तानी तरुणांची सखोल चौकशी करत आहेत. (हे ही वाचा India-Bangladesh Maitri Diwas: भारत-बांगलादेश यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना 50 वर्षे पूर्ण, शेख हसीना यांनी मानले भारताचे आभार.)
व्हिसा मिळाला नाही म्हणुन कुंपण ओलांडण्याचा निर्णय
तरुणाने सांगितले की, सोशल मीडियावर तरुणीची ओळख पटल्यानंतर दोघांनी त्यांचे मोबाईल नंबर शेअर केले आणि नंतर हळूहळू प्रकरण पुढे गेलं. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तरुणाने भारताचा व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र व्हिसा मिळू शकला नाही. आणि नंतर कुंपण ओलांडून भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
आता पोलिसांची चौकशी
राजस्थानमधील गंगानगरचे एसपी आनंद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाला बीएसएफने (BSF) चौकशी पूर्ण केल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांच्या चौकशीनंतर आता या तरुणाची जेआयसी करण्यात येणार आहे. एसपीच्या म्हणण्यानुसार, अद्याप तरुण मुंबईतील महिलेशी संपर्क साधलेला नाही. तरुणाच्या संयुक्त चौकशीनंतर गरज पडल्यासच हे केले जाईल. आमिर सध्या मुंबईतील महिलेला भेटू शकेल अशी शक्यता नाही. तसेच आमिर देशविरोधी कारवायांमध्ये सापडला नाही, तर त्याला पाकिस्तान परत पाठवण्याची कारवाई केली जाईल.