पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विश्वनाथन आनंद (Photo Credits: Getty Images)

फिडे ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाड (FIDE Online Chess Olympiad) जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी भारतीय बुद्धिबळपटूंचे अभिनंदन केले. पंतप्रधान म्हणाले की बुद्धिबळ खेळाडूंचे कठोर परिश्रम आणि समर्पण कौतुकास्पद आहे. फिडे ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाड (Online Chess Olympiad) विजेत्यांचे यश इतर बुद्धीबळ खेळाडूंना उत्तेजन देण्यासाठी सकारात्मक भूमिका बजावेल. आंतरराष्ट्रीय शतरंज महासंघाने पहिल्यांदा फिडे ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारत (India) आणि रशियाला (Russia) सहविजेता म्हणून घोषित केल्यावर अखेरीस पंतप्रधानांनी रशियन संघाचे अभिनंदन केले. स्पर्धेदरम्यान इंटरनेट आणि सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने या ऑनलाइन स्पर्धेत भारत-रशियाला संयुक्त विजेता घोषित करण्यात आले. माजी जगज्जेता विश्वनाथन आनंद (Viswanathan Anand), जलद प्रकारातील विद्यमान जगज्जेती कोनेरु हम्पी अशा प्रतिभावंतांच्या अनुभवाबरोबरच, दिव्या देशमुख, प्रज्ञानंद, निहाल सरीन या युवा बुद्धिबळपटूंची कामगिरीची भारताकडून निसंशय वैशिष्टय़े ठरली.

"FIDE ऑनलाइन जिंकल्याबद्दल आमच्या बुद्धिबळपटूंचे अभिनंदन. त्यांचे परिश्रम आणि समर्पण कौतुकास्पद आहे. त्यांचे यश इतर बुद्धीबळ खेळाडूंना नक्कीच प्रेरणा देईल. मी रशियन संघाचेही अभिनंदन करू इच्छितो," पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले. जगभर कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे पहिल्यांदा ऑलिम्पियाड ऑनलाईन आयोजित करण्यात आले. यापूर्वी, 2014 मध्ये ऑलिम्पियाडमधील भारताने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली जेथे भारताने कांस्यपदक जिंकले.

“आम्ही चॅम्पियन आहोत, रशियाचं अभिनंदन!” विजेता म्हणून घोषणा झाल्यावर भारताचा दिग्गज खेळाडू विश्वनाथन आनंद यांनी ट्विट केलं.

स्पर्धेत यापूर्वी रशियाला विजेता घोषित करण्यात आले होता कारण फायनलमध्ये भारताचे दोन खेळाडू निहाल सरीन आणि दिव्या देशमुख यांनी सर्व्हरसोबत कनेक्शन होत नसल्याने वेळ गमावला. भारताने या वादग्रस्त निर्णयाचा विरोध केला ज्यानंतर याची समिक्षा करण्यात आली आणि भारत-रशिया दोघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आलं. भारताचे हे पहिले ऑलिम्पियाड विजेतेपद होते. स्पर्धे दरम्यान, भारताने गतविजेत्या चीनवर 4-2 अशी मात केली होती. पहिला सामना 3-3 असा बरोबरीत सुटला ज्यामुळे दुसऱ्या सामन्याला निर्णायक महत्त्व प्राप्त झाले.