Uttarakhand Tragedy: तपोवन बोगद्यात सलग आठव्या दिवशी बचावकार्य सुरू; आतापर्यंत 41 मृतदेह सापडले, अद्याप 164 जण बेपत्ता
उत्तराखंड दुर्घटना बचावकार्य (PC - ANI)

Uttarakhand Tragedy: उत्तराखंड (Uttarakhand) च्या चामोली (Chamoli) जिल्ह्यात तपोवन बोगद्यातून (Tapovan Tunnel) आणखी दोन जणांचे मृतदेह सापडले आहेत. दुर्घटनेनंतर आठव्या दिवशी देखील तपोवन बोगद्यात बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत याठिकाणाहून 41 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच 164 जण अद्यापही बेपत्ता आहेत. चामोली जिल्हा दंडाधिकारी स्वाती भदोरिया यांनी सांगितलं की, रविवारी पहाटे बोगद्याच्या आत दोन मृतदेह सापडले. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. तपोवन बोगद्यात बचाव कार्य वेगाने सुरू आहे.

चामोलीच्या ऋषीगंगा खोऱ्यात 7 फेब्रुवारीला झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 41 लोकांचे मृतदेह सापडले आहेत, तर 164 जण अद्याप बेपत्ता आहेत. बोगद्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी सैन्य, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, राज्य आपत्ती निवारण दल, इंडो-तिबेटियन सीमा पोलिसांनी गेल्या एका आठवड्यापासून संयुक्त बचाव अभियान राबवले आहे. शनिवारी, बचाव दल चामोली जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त तपोवन प्रकल्प क्षेत्रात अडकलेल्या 25 ते 35 जणांना वाचवण्यासाठी बोगद्याच्या जागेचे रुंदीकरण करण्याचे काम करत आहेत. (वाचा - Uttarakhand Flood: नक्की का घडली उत्तराखंड दुर्घटना? कोण जबाबदार? जाणून घ्या काय म्हणतात Environment Experts)

रविवारी सकाळी दहाच्या सुमारास ऋषीगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात समुद्रसपाटीपासून 5600 मीटर उंचीवरील ग्लेशियरचे हिमस्खलन झाले. हे हिमस्खलन सुमारे 14 चौरस किलोमीटर क्षेत्र इतके मोठे होते. त्यामुळे पूर आला.

तपोनव येथे इंडो-तिबेट सीमा पोलिसांनी (आयटीबीपी) आपले नियंत्रण कक्ष स्थापित केले आहेत. याठिकाणी आवश्यक साधनसामग्री असलेले 450 आयटीबीपी कर्मचारी बचाव आणि मदत कार्यात गुंतले आहेत. नॅशनल आपत्ती प्रतिसाद फोर्स (एनडीआरएफ) चे पाच पथकही घटनास्थळी दाखल झाले आहेत. याशिवाय अभियंता टास्क फोर्स (ईटीएफ) सह भारतीय लष्कराच्या आठ टीम बचावकार्यात गुंतल्या आहेत.