Dagdusheth Halwai In Siachen: आता सियाचीनमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकात्मक मूतीर्ची करणार स्थापना
Dagdusheth Halwai

काश्मीर, अरुणाचल प्रदेश, पंजाबमध्ये भारतीय सैनिकांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई (>Dagdusheth Halwai) गणपतीच्या प्रतिकात्मक मूतीर्ची स्थापना केली आहे. आता थेट जगातील सर्वात उंचावरील युद्धभूमी असलेल्या सियाचीनमध्ये (Siachen) सैनिकांच्या सर्वधर्म स्थळामध्ये दगडूशेठ गणपतीची प्रतिकात्मक मूर्ती विराजमान होणार आहे. भारतीय लष्करातील 22 मराठा बटालियनच्या (Maratha Battalion) सैनिकांकडे दगडूशेठ गणपतीची 2 फुटांची मूर्ती मंदिरामध्ये आयोजित कार्यक्रमात सुपूर्द करण्यात आली. सियाचीन ही जगातील सर्वात उंचावरची युद्धभूमी आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सैनिक तेथे सिमेचे रक्षण करीत असतात. आता थेट तेथेच गणपती मूतीर्ची स्थापना झाल्यामुळे सैनिकांना उर्जा मिळणार आहे.

दगडूशेठ गणपतीच्या श्रीं’ची प्रतिकात्मक मूर्ती एकता व अखंडतेचे प्रतिक असलेल्या भारतीय सैनिकांच्या सर्वधर्म स्थळामध्ये स्थापन करण्याची इच्छा लष्कराच्या 22 मराठा बटालियनतर्फे व्यक्त करण्यात आली होती. दगडूशेठ ट्रस्टने त्यांच्या इच्छेला मान देऊन ‘श्रीं’ ची हुबेहुब 2 फूट उंचीची प्रतिकात्मक मूर्ती देण्याचे मान्य केले. ही मूर्ती पुण्यातील मूतीर्कार भालचंद्र देशमुख यांनी साकारली आहे. नुकतीच ही मूर्ती बटालियनच्या माऊली रेडेकर, चंद्रकांत पाटील, सचिन पाटील, विजय धनगर या जवानांकडे देण्यात आली. हेही वाचा Raj Thackeray Threat: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना धमकीचा फोन, सुरक्षेत करणार वाढ

यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, अक्षय गोडसे, प्रकाश चव्हाण, माऊली रासने, मूर्तिकार भालचंद्र देशमुख, सिद्धार्थ गोडसे, विजय चव्हाण आदी उपस्थित होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर सर्वदूर पसरलेली आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोप-यातून भाविक पुण्यात येतात. मात्र, भारतीय सैनिक सिमेवर अहोरात्र पहारा देत असल्याने त्यांना पुण्यामध्ये येता येतचं असे नाही.

त्यामुळे 22 मराठा बटालियनचे लेफ्टनंट कर्नल मंदार जाधव यांनी दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असणा-या मूर्तीची प्रतिष्ठापना सिमेवरील लष्कराच्या पोस्टमध्ये सर्वधर्म स्थळावर करण्याची इच्छा बटालियनच्यावतीने व्यक्त केली. ती मूर्ती श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीप्रमाणेच असावी, अशी त्यांची मनोमन भावना होती. त्याप्रमाणे ट्रस्टकडे विनंती करणारे पत्र 19 मार्च 2022 रोजी पाठविले होते.

या संदर्भात श्रीमंद दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषााध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, यापूर्वी देखील काश्मीर येथील गुरेज सेक्टर येथे 6 मराठा बटालियनने तसेच त्यानंतर 1 व 6 मराठा बटालियनने अरुणाचल प्रदेश आणि पंजाबमधील पठाणकोट येथे दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली. सीमेवर गणेशाची मूर्ती स्थापन केल्याने मराठा बटालियनच्या सैनिकांना वेगळी उर्जा मिळते. तसेच या ठिकाणी देशामधील सर्व राज्यांतील सैनिक कार्यरत असतात. त्यामुळे बाप्पाचा आशीर्वाद सर्व सैनिकांना मिळेल, अशी सर्वांची आमची भावना असल्याचे सैनिकांनी यावेळी सांगितले.