वाहनधारकांसाठी खुशखबर! ऑनलाइन टोल भरण्यासाठी 1 डिसेंबरपासून राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर स्वतंत्र FASTags मार्गिका सुरू होणार
Toll Plaza (Image: PTI)

देशामध्ये दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर टोल भरण्यासाठी वाहनधारकांना लांबच लांब रांगेमध्ये थांबवावे लागते. परंतु, आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशभरातील वाहनधारकांसाठी उत्तम उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार, आगाऊ स्वरूपात, ऑनलाइन, कॅशलेस टोल भरणाऱ्या वाहनांना स्वतंत्र मार्गिकेतून कोणत्याही अडथळ्याविना बाहेर पडता येणार आहे. हा उपक्रम 1 नोव्हेंबरपासून प्रायोगिक तत्त्वावर राबविला जात आहे. तर येत्या 1 डिसेंबरपासून तो नियमितपणे राबविण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनधारकांचा वेळ वाचणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राबविलेल्या या उपक्रमाला वाहनधारकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. या उपक्रमामुळे वाहनधारकांचा वेळ वाचणार आहे. सर्व टोल नाक्यांवर तसेच प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर आणि विविध बँकांमध्ये ऑनलाइन रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. वाहनांना टोल नाक्यावर ‘फास्ट टॅग’ (FASTags) दिला जाणार आहे. हा टॅग आपल्या गाडीच्या दर्शनी भागावर लावायचा आहे. त्यामुळे गाडी टोल नाक्यावर येताच तेथील मशीन त्या गाडीची नोंदणी करील. यासाठी टोल नाक्यावर स्वतंत्र मार्गिका ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकाला तसेच प्रवाशांना विना अडथळा प्रवास करता येईल, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे विभागीय मुख्य महाव्यवस्थापक राजीव सिंग यांनी सांगितले.

हेही वाचा - वाहनचालकांनो सावधान! फास्टटॅग नसल्यास 30 नोव्हेंबर नंतर स्विकारला जाईल दुप्पट टोल

या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी वाहनधारकाला 100 रुपये शुल्क भरून कार्ड घ्यावे लागेल. त्यासाठी येत्या शुक्रवारपासून 30 नोव्हेंबरपर्यंत मोफत नोंदणी करण्यात येईल. वाहनधारकांना किमान 500 रुपये आणि त्याहून कितीही रक्कम आगाऊ टोलच्या स्वरूपात भरता येईल. वाहनधारकांना ही रक्कम भरण्याची सुविधा सर्व टोल नाके, प्राधिकरणाचे संकेतस्थळ आणि बँकांमध्ये आहे. विशेष म्हणजे वाहनधारकांना मोबाइलवर ‘माय फास्ट टॅग’ या अ‍ॅपच्या माध्यमातून रक्कम भरता येणार आहे. वाहनधारकांना एक कार्ड 5 वर्ष वापरता येणार आहे.