
आजकाल देशातील आणि जगातील मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले जात आहे. टेक, ऑटो अशा महत्वाच्या क्षेत्रात मंदीचे सावट आहे. दुसरीकडे, भारतातील फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो (Zomato) ने एक आनंदाची बातमी दिली आहे. झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल यांनी लिंकडिन पोस्ट (LinkedIn Post) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नोकरीची ऑफर दिली आहे. दीपिंदर गोयल म्हणाले की, कंपनीत विविध पदांसाठी 800 रिक्त जागांवर नोकर भरती केली जाणार आहे. त्यांनी पुढे लिहिले की, ‘आमच्याकडे 24*7 काम आहे.’
दीपंदर गोयल यांनी लिंकडिनवर नवीन भरती जाहीर करताना आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, झोमॅटोमध्ये 5 भूमिकांसाठी सुमारे 800 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यापैकी कोणत्याही भूमिकेसाठी तुम्ही स्वतः उत्सुक असाल किंवा एखाद्या चांगल्या व्यक्तीला ओळखत असाल, तर त्यांना आमच्याशी संपर्क साधण्यासाठी सुचवा. कंपनीने Engineers, Product Managers, Growth Managers, Chief Of Staff अशा विविध पदांसाठी नोकर भरती सुरु केली आहे.
दीपंदर गोयल यांनी झोमॅटोसाठी नवीन भरतीमध्ये 5 प्रकारच्या नोकऱ्या देऊ केल्या आहेत. तुम्ही झोमॅटोच्या या पदासाठी पात्र असाल तर तुमचा बायोडाटा deepinder@zomato.com वर मेल करू शकता असे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी नोव्हेंबर 2022 मध्ये झोमॅटोने कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली होती. कंपनीने तिच्या एकूण कर्मचार्यांपैकी किमान 4% कर्मचार्यांना कामावरून काढून टाकले होते. (हेही वाचा: झोमॅटोवरील १००० रुपयांचा फुड ऑर्डर मिळणार केवळ २०० ते ३०० रुपयांत, झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा अजब स्कॅम)
दुसरीकडे, यापूर्वी डिसेंबरमध्ये झोमॅटोचे सह-संस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) गुंजन पाटीदार यांनी कंपनीचा राजीनामा दिला होता. गुंजनच्या आधी कंपनीच्या तीन उच्चस्तरीय कर्मचाऱ्यांनीही राजीनामा दिला होता. झोमॅटोने मागच्या जुलै-सप्टेंबर या तिमाहीत आपला तोटा 251 कोटी रुपयांपर्यंत कमी करण्यात यश मिळवले. मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीतील 429.6 कोटी रुपयांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. कंपनीचा महसूल 62.2 टक्क्यांनी वाढून 1,661 कोटी झाला आहे, जो मागील वर्षीच्या याच कालावधीत 1,024 कोटी होता.