लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने नैराश्येतून युवकाने लावून घेतला फास; आत्महत्येस प्रवृत्त केल्याने राज्यमंत्र्यांच्या सूनेविरुद्ध FIR दाखल
Suicide Representational Image (Photo Credits: Pixabay)

देशात कोरोना विषाणू (Coronavirus) मुळे लॉकडाउन (Lockdown) सुरू आहे. आवश्यक सेवा वगळता सर्व काही बंद आहे. अनेक शहरांमध्ये हॉटेल-रेस्टॉरंट्स देखील बंद आहेत. अशा परिस्थितीत आग्रा (Agra) येथील एका रेस्टॉरंटने आपल्याकडे काम करणाऱ्या अ‍ॅल्ड्रिन लिंगदोह (Aldrin Lyngdoh) नावाच्या मुलाला कामावरून काढून टाकले. त्यानंतर नोकरी गेल्याच्या भीतीने आलेल्या नैराश्येतून त्याने गळफास लावून आत्महत्या केली. 31 मार्च रोजी ही घटना घडली आहे. अ‍ॅल्ड्रिन हा मेघालयातील शिलाँगचा रहिवासी होता. याबाबत रेस्टॉरंटची मालकीण, राज्यमंत्र्यांची सून, सीमा चौधरी (Seema Chaudhary) यांच्या विरुद्ध एआयआर दाखल करण्यात आला आहे.

अ‍ॅल्ड्रिन हा फतेहपूर सिक्रीचे भाजपचे आमदार व उत्तर प्रदेशचे मंत्री उदयभान सिंह यांच्या सुनेच्या रेस्टॉरंटमध्ये काम करत होता. आपल्या आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या नातेवाईकांना एक संदेश पाठविला होता, त्यामध्ये तो म्हणतो, ‘मी अतिशय गरीब आहे, माझ्या आई-वडिलांच्या मृत्युनंतर काही तरी करण्यासाठी मी मेघालय येथून बाहेर पडलो. आग्रा येथील कारगिल पेट्रोल पंप चौकाजवळील शांती फूड कोर्ट रेस्टॉरंटमध्ये मी कामाला लागलो. मात्र आता मोदीजींनी माझ्यासाठी सर्व रस्ते बंद केले आहेत. लॉकडाऊन नंतर माझ्या मालकिणीने मला कामावरून काढून टाकले. मालकीण सीमा चौधरी यांच्याकडे मदत मागितली असता, त्यांनी त्यास नकार दिला. आता आत्महत्येशिवाय कोणताच पर्याय शिल्लक नाही.’ (हेही वाचा: बळीराजा तुझ्या बँक खात्यात 2 हजार रुपये जमा झाले का? पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना अंतर्गत केंद्र सरकार ट्रान्स्फर करतंय 5,125 कोटींचा निधी)

सुसाईड नोटमध्ये अ‍ॅल्ड्रिनने राज्यमंत्री उदयभान सिंह यांच्या सूनवर स्पष्टपणे दोषारोप केले आहेत. या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी राज्यमंत्र्यांची सून सीमा चौधरी यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा दावा दाखल केला आहे.

या संदर्भात इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना उदयभान सिंह यांनी, अ‍ॅल्ड्रिनच्या मृत्यूचा रेस्टॉरंट किंवा माझ्या कुटुंबाशी काही संबंध नाही नाही असे सांगितले. आपल्या विधवा सुनेच्या रेस्टॉरंटमध्ये तो वेटर होता, मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये त्याला कामावर ठेवणे योग्य नव्हते म्हणून काढून टाकले असे सिंह यांनी सांगितले.