सध्या राजधानी दिल्लीमधील (Delhi) वाढत्या प्रदूषणाची (Pollution) जोरदार चर्चा आहे. गेल्या काही दिवसांत दिल्लीतील वायू प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सोबतच आजूबाजूंच्या राज्यात पराली जाळल्याने धुराच्या घातक मिश्रणाचे प्रमाणही वाढले आहे. त्यात वाहनातील उत्सर्जनानेही प्रदुषणामध्ये मोठी भर घातली आहे. या सर्वांमुळे एकूणच आरोग्य आणीबाणीची चिंता निर्माण झाली आहे. दरम्यान, हवा गुणवत्ता आणि विविध शहरांतील प्रदूषणावर नजर ठेवणारी स्वित्झर्लंडची हवामान संस्था IQAir कडून जगातील सर्वात जास्त 10 प्रदूषित शहरांची (Worlds Most Polluted Cities) यादी जाहीर करण्यात आली आहे.
त्यात असे दिसून आले आहे की, या दहा शहरांच्या यादीत सर्वात खराब हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांकांसह भारतातील तब्बल तीन शहरे समाविष्ट आहेत. IQAir सेवेने सूचीबद्ध केलेल्या सरासरी AQI 556 सह दिल्ली पहिल्या स्थानावर आहे, तर संपूर्ण यादीत कोलकाता चौथ्या आणि मुंबई सहाव्या स्थानावर आहे. (हेही वाचा: आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर; जाणून घ्या मुंबई, दिल्ली, कोलकातासह तुमच्या शहराचे इंधनाच्या किंमती)
सर्वात वाईट वायु गुणवत्ता निर्देशक आणि प्रदूषण रँकिंग असलेली दहा शहरे –
- दिल्ली, भारत (AQI: 556)
- लाहोर, पाकिस्तान (AQI: 354)
- सोफिया, बल्गेरिया (AQI: 178)
- कोलकाता, भारत (AQI: 177)
- झाग्रेब, क्रोएशिया (AQI: 173)
- मुंबई, भारत (AQI: 169)
- बेलग्रेड, सर्बिया (AQI: 165)
- चेंगडू, चीन (AQI: 165)
- स्कोप्जे, उत्तर मॅसेडोनिया (AQI: 164)
- क्राको, पोलंड (AQI: 160)
राजधानीतील वाढत्या प्रदूषणापासून दिलासा देण्यासाठी ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन (GRAP) च्या आपत्कालीन स्तरावरील चरणांच्या अंमलबजावणीची तयारी सुरू झाली आहे. 18 नोव्हेंबरपर्यंत प्रदूषणात सुधारणा होणे अपेक्षित नाही. या माहितीनंतर सर्व संबंधित यंत्रणांना आणि अधिकाऱ्यांना GRAP अंतर्गत आपत्कालीन पावले उचलण्यासाठी सज्ज राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रदूषणाचे सूक्ष्म कण श्वासासोबत शरीरात प्रवेश करू नयेत यासाठी लोकांना कमीत कमी घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.