अहमदाबाद येथे भारत विरुद्ध पाकिस्तान आयसीसी विश्वचषक 2023 (IND vs PAK World Cup 2023) सामना खेळला जाणार आहे. हा सामना पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या क्रिकेटप्रेमींच्या जबरदस्त मागणीला प्रतिसाद म्हणून, पश्चिम रेल्वेने दुसरी विशेष ट्रेन जाहीर केली आहे. पहिल्या विश्वचषक स्पेशल ट्रेनची सर्व 1230 (एकूण वहन क्षमता) तिकिटे गुरुवारी केवळ 17 मिनिटांत विकली गेली आणि अनेक निराश चाहत्यांना वेटिंग लिस्टमध्ये टाकले गेले. म्हणूनच आता रेल्वेने दुसरी विश्वचषक स्पेशल ट्रेनची घोषणा केली आहे. यामध्ये पहिल्या स्पेशल ट्रेनच्या तुलनेत आसन क्षमतेत लक्षणीय वाढ समाविष्ट आहे. या दुसऱ्या ट्रेनची क्षमता 1531 जागांची आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी या ट्रेनचे वेळापत्रक जाहीर केले. ही गाडी शुक्रवारी, 13 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 11.20 वाजता मुंबई सेंट्रल येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7.20 वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल. परतीचा प्रवास- ट्रेन क्रमांक 09016 ही अहमदाबादहून रविवार, 15 ऑक्टोबर 2023 रोजी पहाटे 02.00 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 10.30 वाजता मुंबई सेंट्रल येथे पोहोचेल.
पश्चिम रेल्वेनुसार, दुसरी विश्वचषक स्पेशल ट्रेन दादर, बोरिवली, पालघर, वापी, वलसाड, नवसारी, सुरत आणि वडोदरा जंक्शनसह विविध स्थानकांवर थांबेल. यामुळे अनेक ठिकाणांहून चाहत्यांना सोयीस्कर प्रवेश मिळेल. ट्रेनची रचना एसी 3-टायर, स्लीपर क्लास आणि द्वितीय श्रेणीचे आसन अशी असेल. ट्रेन क्रमांक 09015 आणि 09016 (दुसरी विश्वचषक स्पेशल) साठी तिकीट बुकिंग 13 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होणार आहे आणि ते सर्व PRS काउंटर आणि IRCTC वेबसाइटवर केले जाऊ शकते. (हेही वाचा: IND vs PAK World Cup 2023 Pitch Report: अहमदाबादच्या खेळपट्टीवर फलंदाज की गोलंदाज कोणाचे असेल वर्चस्व? जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल)
दरम्यान, जगभरातील क्रिकेट चाहते भारत-पाकिस्तान सामन्याची वाट पाहत असतात. त्यात हा सामना विश्वचषकाचा असेल तर तो अजून खास असतो. यावेळी विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना शनिवारी, 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. शनिवारी भारत आणि पाकिस्तानचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडेल.