PM Modi | Photo Credit ANI

8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन (Women's Day) म्हणून साजरा केला जातो. महिलांच्या सक्षमीकरणासाठी, महिलांच्या सन्मानार्थ हा दिवस जगभर साजरा केला जातो. आज 21 व्या शतकात महिला देखील पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहेत. त्यामुळे महिलांमध्येही क्षमता आहे केवळ त्याची योग्य वेळी योग्य दखल घेणं गरजेचे आहे. यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देखील अनोख्या पद्धतीने महिला दिनाच्या सेलिब्रेशन मध्ये सहभागी होणार आहेत. महिला दिनाचं औचित्य साधत यावर्षी 8 मार्च ला नरेंद्र मोदींच्या गुजरात (Gujrat) मधील कार्यक्रमात केवळ महिला सुरक्षा असणार आहे. अशाप्रकारे पंतप्रधानांच्या ताफ्यात केवळ महिला सुरक्षा असण्याची ही पहिलीच वेळ आहे. गुजरात पोलिस दलाकडून हे एक धाडसी पाऊल उचललं जात आहे.

भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधानांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी केवळ महिलांच्या हातात असणार आहे. पंतप्रधानांचा कार्यक्रम - नवसारीतील वांसी बोरसी गावातील हेलिपॅडवर आगमन झाल्यापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत सारा महिला पोलिस कर्मचारी सांभाळणार” असे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी माहिती देताना म्हटलं आहे.

मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये आयपीएस ऑफिसर पासून कॉन्स्टेबल पर्यंत सार्‍या महिला असणार आहेत. पंतप्रधान दोन दिवसीय गुजरात आणि दादरा नगर हवेली दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यामध्ये पीएम मोदी लखपती दीदी संमेलन मध्ये सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम 8 मार्च दिवशी वांसी बोरसी गावात आयोजित केला आहे. या कार्यक्रमात मोदींच्या सुरक्षेमध्ये 2100 कॉन्स्टेबल, 187 उपनिरीक्षक, 61 पोलिस निरीक्षक, 16 पोलिस उपअधीक्षक, पाच पोलिस अधीक्षक, एक पोलिस महानिरीक्षक आणि एक अतिरिक्त डीजीपी दर्जाची महिला अधिकारी सुरक्षेची जबाबदारी सांभाळणार आहे.

. महिला दिनानिमित्त हा उपक्रम जगाला एक मजबूत संदेश देईल आणि गुजरातला एक सुरक्षित राज्य बनवण्यात महिला कशी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत हे देखील सांगेल, असेही ते म्हणाले आहेत.