देशात दररोज स्त्रियांवरील अत्याचार, बलात्कार (Rape), लैंगिक शोषण अशा घटना कानी पडत असतात. आता हरियाणाच्या गुरुग्राममध्ये (Gurugram) एका महिलेने दोन भावांवर सामुहिक बलात्काराचा (Gang Rape) आरोप केला आहे. या महिलेचे म्हणजे आहे की, या दोन भावांनी तिच्यावर 1990 पासून अनेक वेळा सामूहिक बलात्कार केला आहे. गुरुग्राम पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून दोन्ही भावांविरोधात महिला पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला आहे, या प्रकरणात अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीत या 49 वर्षीय पीडित महिलेने सांगितले की, ती आपल्या कुटुंबासह गुरुग्राममध्ये राहते. 1990 मध्ये ती गुरुग्रामला राहायला आली. या दरम्यान तिचा पती आरोपी भावांच्या कंपनीत काम करायचा. त्यानंतर ही महिलाही त्याच कंपनीमध्ये कामाला लागली. तिने दावा केला की त्यातील एका मालकाची तिच्यावर वाईट नजर होती. त्याने अनेकदा तिला आपल्या चेंबरमध्ये बोलावून अयोग्यरित्या स्पर्श केला.
तिने पुढे सांगितले की, 5 ऑगस्ट 1990 रोजी त्यातील एक आरोपी माझ्या खोलीत आला व त्याने माझ्यावर पहिल्यांदा बलात्कार केला. त्यानंतर दुसऱ्या आरोपीनेही तिच्यावर बलात्कार केला व हे सत्र असेच सुरु राहिले. पीडित महिलेने आरोप केला की, या कंपनीचे मालक- हे दोन्ही भाऊ गेल्या 27 वर्षांपासून तिच्यावर सामूहिक बलात्कार करत आहेत. तिने जेव्हा जेव्हा याचा विरोध केला तेव्हा तेव्हा तिला धमकावले गेले, जीवे मारण्याची धमकी दिली. (हेही वाचा: कॉलेज प्रवेशमध्ये घेण्यासाठी आलेल्या 21 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार, फरार आरोपींचा शोध सुरू)
2016 मध्ये ही महिला गर्भवती राहिली होती, तेव्हा 2017 मध्ये या दोघांनी एका खाजगी रुग्णालयात तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. महिलेने दावा केला आहे की त्यानंतरही या दोघांनी तिच्यावर बलात्कार करणे सुरूच ठेवले. आता 31 वर्षानंतर पीडित महिलेने आरोपींवर कारवाईची मागणी करण्याचे धाडस दाखवले आहे. तिने याबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे. तपास अधिकारी म्हणाले की, गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आरोपांची चौकशी केली जात आहे. तपासात समोर आलेल्या तथ्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.