Sachin Bansal | File Image | (Photo Credits: PTI)

फ्लिपकार्टचे (Flipkart) सहसंस्थापक सचिन बन्सल (Sachin Bansal) यांच्याविरुद्ध, पत्नी प्रिया यांनी हुंड्यावरून छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. वृत्तसंस्था आयएएनएसने याबाबत माहिती दिली आहे. फ्लिपकार्टचे सह-संस्थापक सचिन बन्सल यांची पत्नी प्रिया हिने त्याच्याविरुध्द बंगळुरूच्या (Bengaluru) कोरमंगला पोलिस ठाण्यात हुंडा छळ करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी मडीवालाचे सहाय्यक पोलिस आयुक्त कारी बसवणगोवडा यांनी ही माहिती दिली. एफआयआरमध्ये प्रिया यांनी, माझे पती आणि सासरचे लोक हुंड्यासाठी माझा मानसिक आणि शारीरिक छळ करीत आहेत, असे सांगितले. एफआयआरमध्ये चार जणांची नावे नोंदविण्यात आली आहेत - सचिन बन्सल, त्याचे वडील सतप्रकाश अग्रवाल, आई किरण बन्सल आणि भाऊ नितीन बन्सल.

सचिन बन्सल आणि प्रिया यांचा 2008 मध्ये विवाह झाला. 28 फेब्रुवारी रोजी पोलिसात दिलेल्या तक्रारीत 35 वर्षीय प्रियाने आरोप केला आहे की, लग्नानंतर सचिन आणि त्याच्या कुटुंबीयांनी त्यांना हुंड्यासाठी त्रास द्यायला सुरुवात केली. प्रियाच्या वडिलांनी लग्नासाठी 50 लाख रुपये खर्च केले होते आणि सचिनला 11 लाख रुपये रोख दिले होते. असे असूनही सचिनने माझी सर्व संपत्ती त्याच्या नावावर करण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा मी त्यास नकार दिला तेव्हा सचिनने 20 ऑक्टोबर 2019 रोजी माझा शारीरिक छळ केला. कोर्टाच्या नोंदीनुसार सचिन बन्सलची आई किरण बन्सल यांनी काही आठवड्यांपूर्वी, आपल्या सुनेच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता, मात्र याचे कारण कोणालाही माहित नाही. (हेही वाचा: फ्लिपकार्ट कंपनीचे संस्थापक सचिन बन्सल यांनी भरला Advance Tax)

सचिन दिल्लीत गेला असता त्याने आपल्या बहिणीवरही लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपही प्रियाने केला आहे. सचिन विरुद्ध 498 ए (हुंडा छळ), 34 (गुन्हेगारी हेतू) आणि हुंडा बंदी कायद्याच्या कलम 3 आणि 4 द्वारे एफआयआर दाखल केला आहे. सचिन बन्सलने 29 फेब्रुवारी रोजी जामिनासाठी अर्ज दाखल केला असून गुरुवारी या याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे.