तेलंगणातील (Telangana) रंगारेड्डी जिल्ह्यातील मीरपेट येथे अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. येथे एक माजी सैनिकाने आपल्या पत्नीसोबत क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. या व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली व त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते प्रेशर कुकरमध्ये शिजवले. गुन्हा लपवण्याचा हा त्याचा प्रयत्न होता. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत (DRDO) सुरक्षा रक्षक म्हणून काम केलेल्या 45 वर्षीय माजी सैनिक आरोपी गुरु मूर्ती याने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, 18 जानेवारी रोजी आरोपी गुरु मूर्ती आणि त्याच्या पालकांनी हैदराबादच्या बाहेरील मीरपेट येथील पोलीस स्टेशनमध्ये पत्नी व्यंकट माधवी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. यावेळी, गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये भांडण सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी गुरुमूर्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली. यातून सत्य समोर आले. आरोपीने पत्नीचा खून केल्याचे कबूल केले. (हेही वाचा: Malabar Hill Murder Case: चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची गळा दाबून हत्या; मुंबईतील मलबार हिल परिसरातील घटना)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने चौकशीदरम्यान सांगितले की, त्याने मृतदेहाचे तुकडे केले आणि कुकरमध्ये शिजवले. तीन दिवसात मांस आणि हाडे अनेक वेळा शिजवल्यानंतर, त्याने अवशेष पॅक केले आणि ते तलावात फेकले. गुरुमूर्तीच्या वक्तव्यावर आधारित पुरावे गोळा करण्यात पोलीस सध्या व्यस्त आहेत. मृतदेहाच्या तुकड्यांचा शोध सुरू आहे. आरोपी सध्या कांचनबाग येथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे. आरोपीचे 13 वर्षांपूर्वी व्यंकट माधवीसोबत लग्न झाले होते. दोघांना दोन मुले आहेत. या खून प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच संपूर्ण माहिती समोर येईल, असे मीरपेठ पोलिसांनी सांगितले.