
1988 च्या रोड रेज प्रकरणात पटियाला (Patiala Jail) कारागृहात शिक्षा भोगत असलेले काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांची आज सुटका होणार आहे. सिद्धू यांनी 20 मे 2022 रोजी पटियाला मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर शरणागती पत्करली होती. त्यानंतर त्यांना पटियाला कारागृहात पाठविण्यात आले. नियमानूसार सिद्दू यांची सुटका 26 जानेवारी 2024 रोजी होणार होती. मात्र, शिक्षेदरम्यान सुट्टी न घेण्याचा फायदा सिद्दू यांना झाला. नवज्योत सिंह सिद्धू यांचे तुरुंगवासातील चांगले वर्तनही विचारात घेतले गेले.
काय आहे प्रकरण
नवजोत सिंह सिद्धू 1988 मध्ये रोड रेज घटनेत आरोपी होते. हे प्रकरण डिसेंबर 1988 मध्ये गुरनाम सिंग या व्यक्तीच्या मृत्यूशी संबंधित आहे, जेव्हा सिद्धू आणि त्याच्या मित्राने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. 27 डिसेंबर 1988 रोजी सिद्धू आणि रुपिंदर सिंग संधू यांनी पटियाला येथील शेरानवाला गेट क्रॉसिंगजवळ रस्त्याच्या मधोमध त्यांची जिप्सी उभी केली होती. 65 वर्षीय गुरनाम सिंग कारमधून घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी त्यांना बाजूला होण्यास सांगितले.यानंतर सिद्धूने सिंग यांना मारहाण केली होती.
सप्टेंबर 1999 मध्ये सिद्धू यांची हत्येतून निर्दोष मुक्तता करण्यात आली. तथापि, डिसेंबर 2006 मध्ये, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने नवजोत सिंह सिद्धू आणि रुपिंदर सिंग संधू या दोघांनाही हत्येचे प्रमाण न मानता दोषी ठरवले. तसेच प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. नवजोत सिंह सिद्धू आणि रुपिंदर सिंग संधू यांनी या निर्णयाला नंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.