Who is Viraansh Bhanushali? ब्रिटनमधील प्रतिष्ठित ऑक्सफोर्ड विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या या भारतीय विद्यार्थ्याने सध्या सोशल मीडियावर खळबळ माजवून दिली आहे. ऑक्सफर्ड युनियनमध्ये झालेल्या एका वादविवादादरम्यान विरांशने भारताच्या सुरक्षा धोरणावरील टीकेला चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या दहशतवादाचा बुरखा फाडला. त्याचे हे भाषण सध्या जगभरात व्हायरल होत असून, एका रात्रीत विरांश 'इंटरनेट सेन्सेशन' ठरला आहे.
विरांश भानुशाली कोण आहे? विरांश भानुशाली हा मूळचा मुंबईचा रहिवासी आहे. त्याने आपले शालेय शिक्षण मुंबईतील 'एनईएस इंटरनॅशनल स्कूल'मधून (NES International School) पूर्ण केले. सध्या तो ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सेंट पीटर कॉलेजमध्ये (St Peter's College) कायद्याचे (BA Jurisprudence) शिक्षण घेत आहे. विरांश हा २०२६ च्या बॅचचा विद्यार्थी असून तो ऑक्सफर्ड युनियनमध्ये 'चीफ ऑफ स्टाफ' म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहे.
वादविवादाचा विषय काय होता?
ऑक्सफर्ड युनियनमध्ये एका चर्चेचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा विषय होता — "पाकिस्तानबद्दलचे भारताचे धोरण हे सुरक्षेच्या नावाखाली केवळ लोकानुनय (Populist Disguise) आहे." विरांशने या प्रस्तावाच्या विरोधात खंबीरपणे भारताची बाजू मांडली. भारताचे धोरण हे राजकीय फायद्यासाठी नसून ते राष्ट्रीय सुरक्षेच्या वास्तव आणि गंभीर प्रश्नांवर आधारित आहे, असा युक्तिवाद त्याने केला.
२६/११ च्या आठवणींनी वेधले लक्ष आपल्या भाषणात विरांशने २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला. मुंबईकर म्हणून त्या काळात अनुभवलेली भीती आणि आपल्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील भयावह दृश्यांचे त्याने वर्णन केले. "ज्या देशाला स्वतःची नैतिकता नाही, त्यांना दुसऱ्या देशाला लाजवण्याचा कोणताही अधिकार नाही," अशा कडक शब्दांत त्याने पाकिस्तानला सुनावले.
जागतिक स्तरावर कौतुकाचा वर्षाव विरांशने केवळ पाकिस्तानच्या धोरणांवर टीका केली नाही, तर भारताने उरी आणि पुलवामा सारख्या हल्ल्यांनंतर दिलेले प्रत्युत्तर हे धोरणात्मक होते, हे पुराव्यानिशी सिद्ध केले. त्याच्या या भाषणाचे व्हिडिओ कोट्यवधी लोकांनी पाहिले असून, कठीण विषयात भारताची बाजू स्पष्टपणे मांडल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.