
रेल्वेप्रवासादरम्यान प्रवाशांची गैरसोय होणार नाही, त्यांच्या प्रवास सुखकर होण्यासाठी रेल्वे प्रशासन नेहमी तत्पर असते. त्यासाठी पश्चिम रेल्वेने (Western Railway) एक महत्त्वाचे पाऊल उचचले आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील 6 एक्सप्रेसमध्ये 'शॉपिंग ऑन व्हील' (Shopping On Wheel) अशी भन्नाट कल्पना सुरु केली आहे. यात प्रवाशांना प्रवासादरम्यान उत्तमोत्तम सुविधा प्रदान केल्या जातील. तसेच ही संकल्पना यशस्वी झाल्यास पुढील काही दिवसांत आणखी 12 एक्सप्रेसमध्ये ही सेवा सुरु केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे टर्मिनस-अमृतसर पश्चिम एक्सप्रेस, वांद्रे टर्मिनस ते गोरखपूर अंत्योदय एक्सप्रेस, अहमदाबाद-मुंबई सेंट्रल कर्णावती एक्सप्रेस आणि अहमदाबाद-मुंबई सेंट्रल डबल डेकर एक्सप्रेसमध्ये ‘शॉपिंग आॅन व्हील’ संकल्पनेची सुरुवात केली आहे. 2 मार्च रोजी मुंबई सेंट्रल-अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेस, वांद्रे टर्मिनस-जम्मू विवेक एक्सप्रेसमध्ये ही संकल्पना लागू केली होती. त्यामुळे एकूण सहा एक्सप्रेसमध्ये ही संकल्पना सुरू झाली आहे.
हेही वाचा- मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता लोकलमध्ये मिळणार Free Wi-Fi
या शॉपिंग ऑन व्हील सुविधेमध्ये रेल्वे प्रवाशांना महिलांची सौदर्य प्रसाधने, लहान मुलांचे खेळण्याचे साहित्य, स्टेशनरीच्या काही उपयोगी गोष्टी तसेच घरगुती उपयोगी वस्तूंची विक्री केली जात आहे.
या शॉपिंग ऑन व्हील मध्ये 2 कर्मचारी शॉपिंग ट्रॉलीसह वस्तूंची विक्री केली जात आहे. त्यांच्याकडे डेबिट आणि क्रेडिट कार्डची स्वाइप मशीनसुद्धा आहे. हे कर्मचारी विशेष गणवेशात असून सकाळी 8 ते रात्री 9 वेळेत प्रवाशांना ही सुविधा देत आहे.