West Bengal Assembly Elections 2021: भाजपविरुद्ध लढण्यासाठी ममता बॅनर्जींना मिळाले Jaya Bachchan यांचे समर्थन; पश्चिम बंगालमध्ये घेणार सभा व रोड शो
Jaya Bachchan And Mamata Banerjee (Photo Credit : ANI)

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Assembly Elections) वेळी, आता टीएमसी सुप्रीमो ममता बॅनर्जी यांच्या समर्थनार्थ भाजपविरोधी पक्ष एकत्र होऊ लागले आहेत. झारखंडचे मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी यापूर्वी ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ सभा घेतली होती. आता समाजवादी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) टीएमसीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ सभा घेतील. भाजपने अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना प्रचारासाठी उभे केले आहे, आता जया बच्चन त्यांना टक्कर देतील.

ममतांच्या प्रचारार्थींच्या यादीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांचा समावेश आहे. नुकतेच सीएम ममता बॅनर्जी यांनी एक पत्र लिहून विरोधी पक्षाच्या नेत्यांना एकत्र येण्याची आणि भाजपविरुद्ध लढा देण्याचे आवाहन केले होते. ममता बॅनर्जी यांचे मंत्री सुब्रत बॅनर्जी यांनी रविवारी सांगितले की, जया बच्चन रविवारी रात्री कोलकाता येथे पोहचत आहेत. त्या 5 एप्रिल ते 8 एप्रिल दरम्यान बंगालमध्ये असतील. कोलकातामध्ये त्या टॉलीगंज येथील टीएमसीचे उमेदवार अरुप विश्वास यांच्या समर्थनार्थ रोड शो करतील. अरुप बिस्वास यांच्याविरोधात भाजपने केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांना उमेदवार म्हणून उभे केले आहे. (हेही वाचा: Mamata Banerjee यांनी सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांना लिहिले पत्र; BJP विरुद्ध लढण्यासाठी एकजूट होण्याचे केले आवाहन)

टीएमसीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ जया बच्चन 6 आणि 7 एप्रिल रोजी विविध राज्य विधानसभा मतदारसंघात रोड शो घेतील असे सुब्रत मुखर्जी यांनी सांगितले. टीएमसी कॉंग्रेसने बांग्ला निजेर मेयके चाय (बंगालला स्वतःची कन्या हवी आहे) असा नारा दिला आहे. तर आता बंगालची मुलगी जया बच्चन बंगालच्या दुसऱ्या मुलीच्या बाजूने प्रचार करेल. दरम्यान, पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या 294 जागांसाठी आठ टप्प्यात मतदान होणार आहे. केरळ, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू या राज्यासंह 2 मे रोजी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.