राज्यात पुढील आठवड्यात मध्य महाराष्ट्र, कोकण (Konkan) आणि मराठवाडा (Marathwada) या भागात अवकाळी पावसासह (Unseasonal Rain) विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झालंय. त्यामुळे अंदमान, निकोबार, केरळ, तामिळनाडू या भागात 12 मेपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून पावसाने हजेरी लावली. आता बंगालच्या उपसागरात 8 मेपासून कमी दाबाचा पट्टा आहे. त्याचा परिणाम राज्यावर होणार आहे.
वादळ तीव्र होण्याच्या दिशेने आज अनेक राज्यांमध्ये जोरदार वारे आणि पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने वादळाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली असून अनेक भागांसाठी अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागानुसार, बंगालच्या उपसागराच्या लगतच्या भागात 8 मे ते 12 मे दरम्यान बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. त्याचवेळी, 8 ते 11 मे दरम्यान किनारपट्टी आणि सीमावर्ती भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो.
8 मे पर्यंत दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे आणि 9 मे च्या सुमारास, ते आग्नेय बंगालच्या उपसागरात उच्च दाबात रुपांतर होईल. त्यानंतर चक्रीवादळात आणखी तीव्र होऊन मध्य बंगालच्या उपसागराच्या दिशेनकडून उत्तरेकडे सरकेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानंतर 'Mocha' चक्रीवादळ अधिक सक्रीय होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे हवामान विभागाने अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह परिसरात मच्छिमार, लहान जहाजे, बोटी, ट्रॉलर यांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. लोकांनी सागरी किनारी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.