व्हिडिओ: भर बैठकीत दे दणादण, भाजप खासदाराने पक्षाच्या आमदाराला बुटाने मारले
BJP Mp Sharad Tripathi and MLA Rakesh- Singh | (Photo Credits: Twitter)

उत्तर प्रदेशमधील संतकबीर नगर (Sant Kabir Nagar) जिल्ह्यात बीजेपी (BJP) खासदार आणि आमदार यांच्यात जोरदार हाणामारी झाली. भाजप खासदार शरद त्रिपाठी (BJP MP Sharad Tripathi)आणि भाजप आमदार राकेश सिंह (BJP MLA Rakesh Singh) यांच्यात हा राडा झाला. एका बैठकीदरम्यान आमदार आणि खासदार यांच्यात सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर खासदारसाहेबांचा पारा अचानक चढला. त्यांनी पायातील बुट काढून आमदाराच्या डोक्यावर प्रहार केले. उपस्थितांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण तो असफल झाला. खासदार महोदयांनी आमदारांच्या डोक्यावर बुटाचे दहा ते बारा प्रहार केल्यानंतर खासदार साहेबांचा पारा काहीसा निवळला. मात्र, त्यानंतर आमदार महोदयांनी खासदाराच्या अंगावर पुन्हा धाऊन जात मारहाण केली. दरम्यान, उपस्थित पोलीस अधिकाऱ्याने हस्तक्षेप करत वातावरणातील तणाव निवळण्याचा प्रयत्न केला.

प्राप्त माहितीनुसार, या दोन्ही नेत्यांमध्ये कोनशीलेवर (Foundation Stone) कोणाचे नाव लिहायचे यावरुन वाद झाला. या वेळी उपस्थित लोकांनी हे प्रकरण पुढे वाढू नये यासाठी प्रयत्न केले. या नेत्यांमध्ये हाणामारी झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्येही जोरदार राडा झाला. कार्यकर्ते एकमेकांना भीडले. या वेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ही घटना जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा कार्ययोजना समितीच्या बैठकीत घडली. पोलीस अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.

सोशल मीडियामध्ये या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लेटेस्टली या व्हिडिओची पुष्टी करत नाही. या व्हिडिओत भाजप खासदार शरद त्रिपाटी वारंवार बोलताना आढळते की, खासदार कोण आहे. आमदार खासदारांमध्ये झालेल्या या बाचाबाचीत खासदारांचे स्वत:वरील नियंत्रण ढळले त्यांनी राकेश सिंह यांना बुटाने मारहाण केल्याचे प्रथमदर्शनी दिसते. दरम्यान, आमदार राकेश सिंह हेसुद्धा आपल्या आसनावरुन उठले आणि त्यांनीही खासदार शरद त्रिपाटी यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले.