Vision Loss after Cataract Surgery: शस्त्रक्रियेनंतर 18 जणांनी गमावली दृष्टी, राजस्थानमधील शासकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार
Eye | Representational image (Photo Credits: pxhere)

मोतीबिंदूची शस्त्रक्रिया (Cataract Surgery) केल्यानंतर चक्क 18 जणांची दृष्टी गेल्याची घटना घडली आहे. हा प्रकार राजस्थान राज्यातील सवाई मान सिंग (SMS Medical College) रुग्णालयात घडला. राजस्थान राज्यातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय अशी एसएमएस रुग्णालयाची ख्याती आहे. त्याच रुग्णालयात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. सांगितले जात आहे की, एसएमएस रुग्णालयात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील चिरंजीवी आरोग्य योजनेंतर्गत रुग्णांवर उपचार सुरु होते. दरम्यान, हा प्रकार घडला.

मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही रुग्णांनी डोळे दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टारांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. मात्र, शस्त्रक्रिया करुन दोन आठवडे उलठून गेले तरी अद्यापही या रुग्णांची दृष्टी परत आली नाही. इंडिया टुडेने याबाबत दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे की, चंदा देवी नामक एका रुग्णाने तक्रार केली की, त्याच्या एका डोळ्यातून सतत पाणी येत आहे आणि तो त्या डोळ्याने अजिबातच पाहू शकत नाही. डॉक्टरांचे म्हणने असे की, रुग्णाच्या डोळ्याला संसर्ग झाला आहे. त्यामुळे अल्पकाळासाठी दृष्टी गेली आहे. हळूहळू संसर्ग कमी होत जाईल तसतशी दृष्टी परत येईल.

रुग्णांच्या नातेवाईकांनी आरोप केला की, रुग्णालयाच्या उदासीन वृत्तीमुळे हा प्रकार घडला आहे. रुग्णांना वेदना होत असल्याच्या तक्रारी होऊनही रुग्णालय प्रशासनाने त्याकडे आजिबातच लक्ष दिले नाही. रुग्णांच्या आरोग्याबद्दलही पुरेशी काळजी घेण्यात आली नाही.

मोतीबिंदू हा एक डोळ्यांचा विकार आहे. ज्यामुळे दृष्टी हळूहळू कमी होते. मोतीबिंदू हा एक विकार मानला जातो. या विकारात बर्‍याचदा उपचारांचा फायदा होतो. परंतू हा एक वृद्धत्वाचा एक सामान्य आणि अगदी सामान्य भाग देखील आहेत. मोतीबिंदु हळूहळू वाढू लागतो, ज्यामुळे दृष्टीदोष होतो ज्यामुळे तुमच्या दैनंदिन कामात व्यत्यय येऊ शकतो. तुमच्या दृष्टीमध्ये होणारे कोणतेही बदल आणि त्यावर उपचार करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असू शकतात. मात्र त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.