Girl Dies By Suicide In Visakhapatnam College: लैंगिक अत्याचार पीडित अल्पवयीन (17) विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या इमारतीवरुन खाली उडी घेत आत्महत्या केली आहे. पीडितेने आत्महत्येपूर्वी आपल्या बहिणीला उद्देशून लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये 'सॉरी दिदी, मला जावे लागेल' असे म्हटले आहे. सांगितले जात आहे की, पीडितेवर लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) झाला होता. ज्यामुळे ती प्रचंड तणावातून जात होती. पीडित विद्यार्थिनी विशाखापट्टणम येथील पॉलिटेक्नीक कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. आंध्र प्रदेश राज्यातील अनकापल्ले जिल्ह्यातील रहिवासी असलेली पीडिता आणि त्यांच्या कुटुंबीयांची ओळख सुरक्षेच्या कारणास्तव लपविण्यात आली आहे.
केवळ पीडिताच नव्हे तर तिच्यासोबत आणखी काही विद्यार्थिनिंवर लैंगिक अत्याचार झाले होते. ज्या आरोपीने त्यांच्यावर अत्याचार केला होता त्याने पीडितेचे अश्लिल व्हिडिओ काढले होते. ज्याद्वारे तो तिला सातत्याने ब्लॅकमेल करत असे. व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत असे. ज्यामुळे पीडितेने घडल्या प्रकाराची कोठे वाच्यता केली नाही. तसेच, पोलीस अथवा महाविद्यालय प्रशासनाकडे तक्रारही नोंदवली नाही.
पीडितेने आत्महत्येपूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत आपली बहीण आणि कुटुंबीयांना उद्देशून अतीशय भावूक संदेश लिहीला आहे. गर्भवती असलेल्या आपल्या मोठ्या बहिणीचे तिने अभिनंदन केले आहे. तर आपल्या धाकट्या बहिणीसाठी एक संदेशही दिला आहे. 'तुझ्या भविष्यावर लक्ष केंद्रित कर आणि तुला जे आवडेल त्याचा अभ्यास कर. माझ्यासारखे विचलित होऊ नकोस, इतरांवर प्रभाव टाकू नकोस. सदैव आनंदी राहा आणि चांगले आयुष्य जगा. माफ कर दिदी, मला जावे लागेल'. दरम्यान, पीडितेने लिहिलेल्या चिठ्ठीनुार महाविद्यालयातील इतरही अनेक विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समजते.
पीडितेने वडिलांना उद्देशून लिहिले आहे की, महाविद्यालयात तिचा लैंगिक छळ होत असल्याने तिने हे पाऊल उचलले आहे. "तुम्ही विचाराल की मी प्राध्यापकांकडे तक्रार का करत नाही, पण त्याचा काही फायदा होणार नाही. त्यांनी (तिचा छळ करणाऱ्यांनी) माझे फोटो काढले आहेत आणि मला धमकावत आहेत. इतर मुलीही आहेत. आम्ही कोणालाही सांगू शकत नाही. आणि आम्हाला कॉलेज टाळताही येत नाही. आम्ही मध्येच अडकलो. मी पोलिस तक्रार केली किंवा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तर ते माझे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध करतील.”
पीडितेचा संदेश मिळताच कुटुंबीयांनी तातडीने प्रतिसाद दिला. कुटुंबीयांनी तिला फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने तो स्वीकारला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी टेक्स्ट मेसेज करत सांगिले की, आम्ही पोलिसांशी संपर्क केला आहे. ते रस्त्यात आहेत. तु असे वेडेवाकडे पाऊल उचलू नको. मात्र, तोवर उशीर झाला होता. पीडितेने आत्महत्या केली होती.
पीडितेच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. ज्यामध्ये म्हले आहे की, माझ्या मुलीचा मृत्यू का झाला हे मला माहित असणे आवश्यक आहे. मी तिला खूप प्रेमाने आणि काळजीने वाढवले. तिने दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवले आणि तिला येथे चांगले शिक्षण मिळेल या विश्वासाने आम्ही तिला या महाविद्यालयात प्रवेश दिला.