VIP चे अस्तित्व संपले, बिहारमध्ये पाहता पाहता मित्रपक्ष भाजपच्या घशात; घ्या जाणून
BJP flags (Photo Credits: IANS)

राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपने बिहारमध्ये एका प्रादेशिक पक्षाचा तुकडा पाडत अवघा पक्षच घशात घातला आहे. बिहारमधील विकासशील इन्सान पार्टी (VIP) च्या सर्वच्या सर्व तीन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तीन्ही आमदारांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे. त्यामुळे विकासशील इन्सान पार्टीचे बिहामधील आस्तित्व संपले आहे. धक्कादाय म्हणजे 'व्हीआयपी' हा भाजपचा मित्रपक्ष होता. तीन आमदारांच्या रुपात भाजप (BJP) बिहारमधील सर्वात मोठा (77) पक्ष ठरला आहे. या आधी लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचा राष्ट्रीय जनता दल (RJD) हा बिहारमधील सर्वात मोठा (75) पक्ष होता.

बिहार विधानसभेत भाजप आमदारांची संख्या 74 होती. त्यात आता व्हीआयपीमधून आलेल्या 3 आमदारांचा समावेश झाल्याने भाजप आमदारांची संख्या 77 इतकी झाली आहे. व्हीआयपी पक्षाचे एकूण 4 आमदार होते. यातील मुसाफिर पासवान यांच्या निधनानंतर व्हीआयपीकडे केवळ 3 आमदार राहिले होते. त्या आमदारांनीही थेट भाजप प्रवेश केला आहे. (हेही वाचा, Assembly Election 2022: चार राज्यात विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या विजयानंतर पुण्यातील कार्यकर्त्यांमध्ये वाढला आत्मविश्वास)

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदारांची नावे

  • मिश्री लाल यादव
  • राजू सिंह
  • स्वर्णा सिंह

बिहारमधील भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला. या वेळी उपमुख्यमंत्री तारकिशोर सिंह आणि रेणू देवी उपस्थित होते. पक्षाच्या तिन्ही आमदारांनी भाजप प्रवेश केल्याने मुकेश सहनी यांना जोरदार झटका बसला आहे. मुकेश सहनी हे व्हीआयपीचे संस्थापक आहेत. तिन्ही आमदारांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करावा यासाठी सहनी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर तिन्ही आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याबाबत पत्र दिले. विधानसभा अध्यक्षांनी काही वेळातच हे विलीनीकरण मंजूर केले.

बिहार विधानसभा पक्षीय बलाबल

  • भाजपा : 77
  • राजद : 75
  • जदयू :45
  • कांग्रेस : 19
  • माले :12
  • एआईएमआईएम : 05
  • हिन्दुस्तानी आवाम मोर्चा :04
  • सीपीएम : 02
  • सीपीआई :02
  • निर्दलीय (जदयू को समर्थन) : 01
  • रिक्त : 01

दरम्यान, तिन्ही आमदारांच्या पक्षप्रवेशावेळी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्षांनी म्हटले की, या आमदारांचा भाजप प्रवेश म्हणजे घरवापसी आहे. हे तिन्ही आमदार भाजप तिकीटावर लढणार होते. मात्र, काही तडजोडींमुळे त्यांना व्हीआयपीचे तिकीट घ्यावे लागले. व्हीआयपी प्रमुख जायसवाल यांनी या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, पाठिमागील काही दिवासांमध्ये ज्या काही घटना घडत होत्या त्यासोबत तीन्ही आमदार सहमत नव्हते. या लोकांना आपली घरवापसी व्हावी असे वाटत होते. त्यामुळे यांना भाजपमध्ये विलीन करण्याचा विचार करण्यात आला.