प्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांचे वयाच्या 81व्या वर्षी निधन
गिरीश कर्नाड (Photo Credit : Youtube)

कन्नड भाषेतील आधुनिक भारतीय नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार गिरीश कर्नाड यांचे बंगळुरू येथे निधन झाले आहे. आज सकाळी 6.30 वाजता, दीर्घ आजाराने वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 19 मे, 1938 साली माथेरान येथील एका कोकणी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. गिरीश कर्नाड यांनी मराठी, कन्नड आणि हिंदी भाषेत अनेक चित्रपट आणि नाटके दिग्दर्शित केली आहेत. पद्मभूषण, पद्मश्री आणि ज्ञानपीठ सारख्या सर्वोच्च पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

तुघलक, नागमंडल, हयवदन या मराठी नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. गिरीश कर्नाड यांचे चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण वंशवृक्ष या चित्रपटाद्वारे झाले. उंबरठा आणि उत्सव या चित्रपटांनी त्यांना विशेष ओळख प्राप्त करून दिली. हिंदी, मल्याळम, तेलुगू, तमिळ, मराठी अशा 70 हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. गिरीश कर्नाड हे 1976-78 दरम्यान कर्नाटक साहित्य अकादमीचे अध्यक्ष होते. त्यांच्या नाट्यक्षेत्रातील योगदानासाठी कर्नाटक विद्यापीठाने डॉक्टरेटने आणि युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाने डी.लिट. या पदवीने त्यांना सन्मानित केले आहे.

गिरीश कर्नाड यांनी ’आडाडता आयुष्य’ (खेळता खेळता आयुष्य) या नावाने कन्नड भाषेत आत्मचरित्र लिहिले होते. त्याचे उमा कुलकर्णी यांनी, ’घडले कसे’ या नावाने केलेले मराठी भाषांतर चांगलेच गाजले होते.