Lok Sabha Election 2024: भाजपने उमेदवारी नाकारत धक्का दिल्यानंतर वरुण गांधी यांचे पिलभीतच्या जनतेला उद्देशून पत्र, अविरत सेवेचे वचन
Varun Gandhi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भारतीय जनता पक्षाचे (BJP) खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांनी पिलीभीत (Pilibhit Lok Sabha Constituency) लोकसभा मतदारसंघातील मतदार आणि नागरिकांना उद्देशून लिहिलेल्या पत्राची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे. आपल्या परखड विधानांमुळे चर्चेत असलेल्या वरुण यांची उमेदवारी संभाव्य लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) धोक्यात असल्याच्या चर्चा सुरुवातीपासूनच राजकीय वर्तुळ आणि भाजपमध्येही होत्या. त्यास उमेदवारयादीतून पुष्टीच मिळाल्याचे पुढे आले. या सर्व पार्श्वभूमीवर वरुण यांनी आपल्या भावनांना पत्राच्या माध्यमातून वाट मोकळी करुन दिली आहे. वरुण गांधी यांनी 28 मार्च रोजी हे पत्र लिहीले आहे.

मनेका गांधी यांना उमेदवारी जाहीर

भारतीय जनता पक्षाने नुकतीच लोकसभा निवडणूक 2024 साठीची उत्तर प्रदेश राज्यातील उमेदवारांची पाचवी यादी यादी 25 मार्च रोजी जाहीर केली. या यादीमध्ये मातोश्री मनेका गांधी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, वरुण गांधी यांना वगळण्यात आले आहे. त्यांच्या ऐवजी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या जतिन प्रसाद यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वरुण गांधी यांनी आपल्या X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर लिहिलेल्या पोस्टसोबत हे पत्र जाहीर केले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, “आज मी हे पत्र लिहित असताना, असंख्य आठवणींनी मला भावूक केले आहे. मला आठवतंय तो 3 वर्षाचा लहान मुलगा जो 1983 मध्ये पहिल्यांदा आईचं बोट धरून पिलीभीतला आला होता. त्याला कसं कळलं की एक दिवस ही जमीन त्याच्या कामाचं ठिकाण होईल आणि इथले लोकच त्याचं कुटुंब बनतील. (हेही वाचा, Varun Gandhi meets Sanjay Raut: वरुण गांधी आणि संजय राऊत यांच्यात तीन तास चर्चा, राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधान)

'नागरिकांचा सन्मान, सेवा यांना क्षमतेनुसार जपले'

“मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला पिलीभीतच्या महान लोकांची वर्षानुवर्षे सेवा करण्याची संधी मिळाली. पिलीभीतमधून मला मिळालेले आदर्श, साधेपणा आणि दयाळूपणा यांचा माझ्या संगोपनात आणि विकासात, केवळ एक खासदार म्हणूनच नव्हे तर एक व्यक्ती म्हणूनही मोठा वाटा आहे. तुमचा प्रतिनिधी असणं हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे आणि मी तुमच्या हितसंबंधांना नेहमीच माझ्या क्षमतेनुसार जपले आहे,” असे वरुण गांधी यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Varun Gandhi on BJP Government: वरुण गांधी यांचे भाजप सरकारच्या कृषी धोरणावर सवाल, धान्याला आग लावतानाचा शेतकऱ्यांचा व्हडिओही सोशल मीडियावर शेअर)

'सेवा करण्यासाठी मी कटिबद्ध'

वरुण गांधी यांनी या पत्रात पुढे लिहिले आहे की, “माझा खासदार म्हणून कार्यकाळ संपत असला तरी, माझे पिलीभीतशी असलेले नाते माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत संपू शकत नाही. खासदार म्हणून नाही तर एक मुलगा म्हणून आयुष्यभर तुमची सेवा करण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि तुमच्यासाठी माझे दरवाजे पूर्वीप्रमाणेच सदैव खुले राहतील. सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी मी राजकारणात आलो आणि आज कितीही किंमत मोजावी लागली तरी हे कार्य सदैव करत राहण्यासाठी मी तुमचा आशीर्वाद घेतो. माझे आणि पीलीभीतमधील नाते हे प्रेम आणि विश्वासाचे आहे, जे कोणत्याही राजकीय गुणवत्तेपेक्षा खूप वरचे आहे. मी तुझाच होतो, आहे आणि राहीन."

दरम्यान, वरुण गांधी यांनी पीलभीत येथून सलग दोन वेळा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. या मतदारसंघात लोकसभआ निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. या जागेवरुन उमेवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 27 मार्च होती.