उत्तर प्रदेशातील वाराणसी (Varanasi) जिल्ह्यात चार जणांच्या हत्येने खळबळ उडाली आहे. आरोपीने पत्नी आणि तीन मुलांची निर्घृण हत्या केली आहे. हत्येची घटना भेलूपूर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या भडाईनी परिसरात घडली. अहवालानुसार, आरोपी राजेंद्र गुप्ता नावाच्या व्यक्तीने चार जणांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपी राजेंद्र फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रकरणाचा तपास सुरू केला.
प्राथमिक माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये वर्षभरापासून वाद सुरू होता. वादामुळे पती राजेंद्र गुप्ता आणि पत्नी नीतू गुप्ता वेगळे राहत होते. मंगळवारी सकाळी राजेंद्र गुप्ता यांच्या आईने दरवाजा ठोठावला आणि दरवाजा न उघडल्याने तिने शेजाऱ्यांना बोलावले. त्यानंतर ही दु:खद घटना उघडकीस आली. मृतांमध्ये 25 वर्षांचा मुलगा आणि 15 आणि 16 वर्षांच्या दोन मुलींचा समावेश आहे. याशिवाय नीतू गुप्ता यांचे वय 42 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रथमदर्शनी या वेदनादायक घटनेचे कारण कौटुंबिक वाद असल्याचे सांगितले जात आहे.
तांत्रिकाच्या सल्ल्यावरून व्यक्तीने केली पत्नीसह तीन मुलांची हत्या-
Uttar Pradesh: Neetu Gupta, 45, and her three children were found murdered in Varanasi. Police suspect her husband, Rajendra Gupta, who fled after returning home for Diwali following a year-long absence. An investigation is underway pic.twitter.com/B3Lc65SFEk
— IANS (@ians_india) November 5, 2024
आरोपी राजेंद्रचे देशी दारूचे दुकान आहे. घटनेच्या वेळी राजेंद्रची आई घरीच होती, मात्र त्यांना घटनेबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगण्यात येत आहे. अंधश्रद्धेमुळे राजेंद्रने कुटुंब उद्ध्वस्त केल्याची या घटनेबाबत माहिती मिळत आहे. या प्रकरणात आरोपी राजेंद्र एका तांत्रिकाच्या संपर्कात असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. या तांत्रिकाने त्याला सांगितले होते की, त्याच्या प्रगतीमध्ये त्याचे कुटुंब बाधा ठरत आहे. अशाप्रकारे त्याच्या सल्ल्यानुसार तो आपल्या पत्नीला आपल्या कामात अडथळा मानू लागला. यामुळेच त्याने पत्नी आणि मुलांची हत्या केली. (हेही वाचा: Woman Cuts Off Husband's Private Part: दिल्लीत घरगुती वादातून महिलेने कापले पतीचे गुप्तांग; आरोपी पत्नी फरार)
त्याचवेळी ही माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीसह तांत्रिकाचा शोध सुरू केला आहे. काशी झोनचे डीसीपी गौरव बन्सवाल यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजेंद्र गुप्ता फरार आहे, त्याच्या अटकेसाठी अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत. त्याला अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.